भारताचा स्टार फलंदाज आणि टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या कामगिरीत मोठी घसरण झाली आहे. २०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सूर्याने पहिल्या तीन वर्षांत टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली होती. पण नंतर त्याच्या फॉर्मचा आलेख बराच खाली आला.
गेल्या वर्षी म्हणजे २०२४ हे वर्ष सूर्यासाठी काही खास नव्हते. गेल्या वर्षी त्याची संमिश्र कामगिरी होती. तर २०२५ मध्ये, भारताच्या टी-20 कर्णधाराने आतापर्यंत दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याची बॅट शांत राहिली आहे. टीम इंडिया सध्या इंग्लंडविरुद्ध ५ टी-20 सामन्यांची मालिका खेळत आहे.
या मालिकेतील पहिले दोन सामने झाले असून त्यात भारतीय कर्णधार फ्लॉप ठरला आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात सूर्या शुन्यावर बाद झाला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याने केवळ १२ धावा केल्या.
भारतासाठी प्रामुख्याने टी-20 क्रिकेट खेळणाऱ्या सूर्याने २०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि त्या वर्षी त्याने ११ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. ९ डावात फलंदाजी केली आणि ३४.८५ च्या सरासरीने आणि १५५.४१ च्या स्ट्राइक रेटने २४४ धावा केल्या.
त्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजे २०२२ मध्येही सूर्याची बॅट जोरात बोलली. त्यावर्षी त्याने ३१ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या ३१ डावांमध्ये ४६.५६ च्या सरासरीने आणि १८७.४३ च्या स्ट्राइक रेटने ११६४ धावा केल्या.
यानंतर २०२३ मध्येही सूर्याने उत्कृष्ट फॉर्म दाखवला. या वर्षी भारताच्या टी-20 कर्णधाराने १८ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. या सामन्यांच्या १७ डावात फलंदाजी करताना त्याने ४८.८६ च्या सरासरीने आणि १५५.९५ च्या स्ट्राईक रेटने ७३३ धावा केल्या.
सूर्याला २०२४ मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना विशेष काही करता आले नाही. त्याने १८ सामन्यांच्या १७ डावात २६.८१ च्या सरासरीने ४२९ धावा केल्या. यावर्षी त्याने आपल्या बॅटने शतकही झळकावले नाही. आता २०२५ च्या पहिल्या दोन सामन्यांमध्येही सूर्याची बॅट शांत दिसली आहे.
संबंधित बातम्या