T20 World Cup 2024 Super 8 Qualification Chances : टी-20 विश्वचषक २०२४ सुरू होऊन दोन आठवडेही उलटले नाहीत, पण काही मोठे संघ विश्वचषकातून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत. यात सर्वात आघाडीवर पाकिस्तान आहे. कारण त्यांनी सलग दोन सामने गमावले आहेत.
एकीकडे भारत, दक्षिण आफ्रिका आणि स्कॉटलंड हे संघही सुपर-८ मध्ये जाणार असल्याचे दिसत आहे. तर ३ मोठे संघ बाद होण्याचा धोका आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणते ३ मोठे संघ विश्वचषकातून बाहेर होण्याच्या मार्गावर आहेत.
या T20 विश्वचषक स्पर्धेत ए गटातील पाकिस्तानने आतापर्यंतचे दोन्ही सामने गमावले आहेत. प्रथम अमेरिकेकडून आणि नंतर भारताकडून पराभवाची चव चाखावी लागली. पाकिस्तानचे सध्या २ सामन्यांत शुन्य गुण आहेत. सुपर-८ मध्ये जायचे असेल तर पुढील दोन सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. पाकिस्तानचा त्रास इथेच संपणार नाही कारण कॅनडा आणि अमेरिकेने पुढील सर्व सामने मोठ्या फरकाने हरावे अशी प्रार्थना करावी लागेल.
पाकिस्तान आणि अमेरिका या दोघांचेही प्रत्येकी ४ गुण असू शकतात आणि अशा स्थितीत नेट रनरेटनुसार निर्णय घेतला जाईल. पण जर अमेरिकेचा एकही सामना पावसाने रद्द झाला तर पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर पडेल. सध्या बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाच्या अडचणी वाढल्या आहेत.
ब गटातील इंग्लंड संघही अडचणीत असल्याचे दिसत आहे. इंग्लंडचा स्कॉटलंडसोबतचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. तर दुसऱ्या सामन्यात जोस बटलरच्या संघाला ३६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. आता इंग्लंडचा २ सामन्यांत १ गुण आहे आणि संघाचा नेट रनरेट -१.८०० आहे.
आता इंग्लंडला पुढील २ सामने ओमान आणि नामिबियाविरुद्ध मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. याशिवाय स्कॉटलंडला ऑस्ट्रेलियाकडून मोठ्या फरकाने पराभूत व्हावे अशी प्रार्थना करावी लागेल. सध्या गतविजेत्या इंग्लंडची परिस्थिती अत्यंत कठीण दिसत आहे.
सी गटातील न्यूझीलंडचा स्पर्धेतील त्यांच्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानकडून ८४ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव झाला. किवी संघाचे अजून ३ सामने बाकी अहेत. पण त्यांचा नेट रनरेट -४.२०० आहे. वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तानने आतापर्यंत आपले दोन्ही सामने जिंकले आहेत आणि ते सी गटात टॉप-२ मध्ये आहेत. न्यूझीलंडला सुपर-८ मध्ये जायचे असेल तर त्यांना सर्व सामने जिंकावे लागतील.
या गटात अजूनही बरंच काही घडू शकतं, पण यजमान वेस्ट इंडिज पुढचे दोन सामने हरेल, अशी प्रार्थना किवी संघाला करावी लागेल. अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड या तिन्ही संघात चुरशीची स्पर्धा होणार आहे. अशा परिस्थितीत सुपर-८ चा निर्णय नेट रन-रेटवर आधारित असेल.
अ गटाबद्दल बोलायचे झाले तर यजमान यूएसए खूप मजबूत स्थितीत असल्याचे दिसत आहे. या संघाने २ विजय नोंदवून ४ गुण जमा केले आहेत. जर पुढील २ पैकी १ सामना USA ने जिंकला आणि कॅनडाला एक पराभव पत्करावा लागला तर USA सुपर-८ साठी पात्र होईल. ४ गुण आणि चांगल्या नेट रन-रेटमुळे आणि यूएसए टप्प्यात जाऊ शकते.
दुसरीकडे, सी गटातील अफगाणिस्तान सध्या सुपर-८ मध्ये जाण्याचा प्रबळ दावेदार असल्याचे दिसत आहे. अफगाणिस्तानने पुढच्या दोन सामन्यांपैकी एकही सामना जिंकला तर त्यांचे सुपर-८ मधील स्थान जवळपास निश्चित होईल.
संबंधित बातम्या