आयपीएल २०२४ मध्ये सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्जचा ६ गडी राखून पराभव केला. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने ५ विकेट गमावत १६५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात हैदराबादने १६ चेंडू बाकी असताना ४ विकेट्स गमावून लक्ष्य गाठले.
हैदराबादसाठी एडन मार्करामने ३६ चेंडूंत ४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५० धावांची खेळी केली.
तत्पूर्वी, अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेडने वेगवान सुरुवात केली होती, त्याचा फायदा संघाला झाला. चेन्नईकडून मोईन अलीने २ बळी घेतले. याआधी चेन्नईचा दिल्ली कॅपिटल्सकडूनही पराभव झाला होता आणि या मोसमात त्यांना सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादचा ४ सामन्यांतील हा दुसरा विजय ठरला.
लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माने हैदराबादला दमदार सुरुवात करून दिली. अभिषेक शर्माने अवघ्या १२ चेंडूत ३७ धावा केल्या, ज्यात ४ षटकार आणि ३ चौकारांचा समावेश होता. अभिषेकच्या खेळीने हैदराबादला गती दिली. अभिषेक बाद झाल्यानंतर, एडन मार्कराम आणि ट्रॅव्हिस हेड यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६० धावा जोडल्या, ज्यामुळे CSK चा संघ पूर्णपणे बॅकफूटवर गेला आणि सामना गमावला.
याआधी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने पाच विकेट्सवर १६५ धावा केल्या. सीएसकेसाठी शिवम दुबेने २४ चेंडूंत ४ षटकार आणि दोन चौकारांसह सर्वाधिक ४५ धावा केल्या. तर अजिंक्य रहाणेने ३० चेंडूत २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ३५ धावा केल्या. रहाणे आणि शिवममध्ये ६५ धावांची भागीदारी झाली.
रवींद्र जडेजा २३ चेंडूत ३१ धावा करून नाबाद राहिला. त्याने ४ चौकार मारले. अजिंक्य रहाणेने ३५ धावांचे योगदान दिले. ऋतुराज गायकवाड २६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार, नटराजन, पॅट कमिन्स, शाहबाद अहमद आणि जयदेव उनाडकट यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.