Sunil Gavaskar IND vs AUS : ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिकेत भारताचा ३-१ असा पराभव केला. पाच सामन्यांच्या मालिकेतील एक सामना अनिर्णित राहिला. टीम इंडियाच्या पराभवानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक संताप आणणारे काम केले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही कसोटी मालिका ॲलन बॉर्डर आणि सुनील गावस्कर यांच्या नावावर आहे. मात्र क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्रॉफी प्रदान करताना गावस्कर यांना निमंत्रित केले नाही. त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. दरम्यान, हे प्रकरण वाढल्यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपली चूक मान्य केली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील शेवटचा सामना सिडनी येथे खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाला ६ विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर ट्रॉफी देण्यासाठी प्रझेंटेशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या सोहळ्यात पुरस्कार वितरण करण्यासाठी फक्त ॲलन बॉर्डर हेच दिसले.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारतीय दिग्गज सुनील गावस्कर यांना निमंत्रित केले नाही. ही मालिका बॉर्डर आणि गावस्कर यांच्या नावावर आहे. मात्र ट्रॉफीसाठी आयोजित समारंभात फक्त बॉर्डर यांनाच आमंत्रित करण्यात आले होते.
ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर ही ट्रॉफी कर्णधार पॅट कमिन्सला देण्यात आली. यादरम्यान बॉर्डर यांनी कमिन्सला ट्रॉफी प्रदान केली. भारतीय दिग्गज गावस्कर सीमारेषेजवळ उभे होते. क्रिकबझच्या वृत्तानुसार, गावस्कर यांनी या प्रकरणाबाबत सांगितले की, "मला ट्रॉफी सेरेमनीबाबत काहीही सांगण्यात आले नाही."
गावस्कर यांना निमंत्रित न करण्याची चूक क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मान्य केली आहे. ॲलन बॉर्डर यांच्यासह सुनील गावसकर मंचावर असते तर बरे झाले असते, असे मंडळाने म्हटले आहे.
एका रिपोर्टनुसार, क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, हे प्लॅननुसारच घडले आहे. खरे तर भारत जिंकला असता तर गावसकर यांच्या हातून हा ट्रॉफी देण्याचा सोहळा झाला असता. ऑस्ट्रेलिया जिंकल्याने बॉर्डर यांनी ट्रॉफी दिली.
संबंधित बातम्या