Sunil Gavaskar Angry On Indian Team Coaching Staff : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ मध्ये भारतीय संघाला ३-१ असा पराभव स्वीकारावा लागला. मालिकेतील शेवटच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ विकेट्सनी धुव्वा उडवला. भारताच्या या पराभवानंतर टीम इंडियाचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर चांगलेच संतापले आहेत. गावस्कर यांनी टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
स्टार स्पोर्ट्सवर बोलत असताना सुनील गावस्कर म्हणाले, "तुमचा कोचिंग स्टाफ काय करत होता? तुमचे बॉलिंग कोच, बॅटिंग कोच... बॅटिंग कोच बघा, न्यूझीलंडविरुद्ध ४५ रन्सवर ऑल आऊट झाले. त्यानंतर बाकीच्या सामन्यांमध्येही भारतीय फलंदाजांनी वाईट कामगिरी केली. इथेही फलंदाजीत ताकद नव्हती. तेव्हा प्रश्न विचारला पाहिजे, तुम्ही काय केले? कामगिरीत सुधारणा का दिसत नाही?"
गावसकर पुढे म्हणाले, "ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी चांगली होती, हे कारण ठीक आहे, जर चांगला गोलंदाज आणि चांगला चेंडू असेल तर कोणतीही अडचण नाही. महान खेळाडूंनाही जेव्हा चांगले चेंडू येतात तेव्हा अडचणींचा सामना करावा लागतो. पण चांगली गोलंदाजी होत नव्हती तेव्हा तुम्ही काय केलं.
खेळाडूंच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण करताना आपण कोचिंग स्टाफलाही प्रश्न विचारायले हवे. तसेच, काही खेळाडूंना पुढील मालिकेत खेळवायचे की नाही, याची चर्चा आपण करतो. तसे या कोचिंग स्टाफलादेखील पुढील मालिकेत ठेवायचे की नाही, हेदेखील आपण विचारले पाहिजे.
इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेबाबत गावसकर म्हणाले, "आम्हाला इंग्लंडला जाण्यासाठी २-३ महिने आहेत. मी चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल बोलत नाहीये. मी पुढे होणाऱ्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेबद्दल बोलत आहे. मी एक कसोटी सामन्याचा खेळाडू होतो, मला एकदिवसीय क्रिकेटबद्दल इतके ज्ञान नाही.
म्हणूनच मी पण विचारलं, तुम्ही कसोटी संघाची कामगिरी कशी सुधारू शकता? आपण काय केले आहे? फक्त थ्रो डाऊन थ्रो डाऊनने काही होत नाही. फलंदाजांचे टेक्निक सुधारायला पाहिजे. तुम्ही ते केले नाही. ज्या खेळाडूंनी धावा केल्या नाहीत त्यांच्याबद्दल प्रश्न जरूर विचारा. पण कोचिंग स्टाफवरही प्रश्न उपस्थित करा.'
संबंधित बातम्या