भारतीय फुटबॉलचा पोस्टर बॉय आणि कर्णधार सुनील छेत्री याच्या निरोपाचा सामना (Sunil Chhetri Retired) बरोबरीत सुटला. भारत आणि कुवेत यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. यामुळे भारताला फिफा विश्वचषकाची पात्रता फेरी जिंकता आली नाही. परंतु सॉल्ट लेक स्टेडियमवर उपस्थित असलेल्या १ लाख फुटबॉल चाहत्यांनी सुनील छेत्रीवर प्रेमाचा वर्षाव करण्यात कोणतीही कसर सोडली नाही.
सामना संपल्यानंतर छेत्रीच्या डोळ्यात अश्रू तरळले होते आणि त्याच्यावर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांचेही डोळे पाणावले होते. छेत्रीनेही संपूर्ण स्टेडियम फिरून प्रेक्षकांचे हात जोडून आभार मानले. भारतीय संघाने सुनील छेत्रीला गार्ड ऑफ ऑनर दिला तेव्हा तो ढसाढसा रडू लागला.
याआधी या सामन्यात भारताला अनेक संधी मिळाल्या, पण भारतीय संघ त्यांचा फायदा घेऊ शकला नाही. या ड्रॉमुळे भारताचे ५ गुण झाले असून त्यांना आता फिफा विश्वचषक पात्रता फेरीतील तिसरी फेरी गाठण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. भारताला शेवटचा गट सामना बलाढ्य कतारविरुद्ध खेळायचा आहे.
छेत्रीला निरोप देण्यासाठी हजारो प्रेक्षक स्टेडियमवर पोहोचले होते. त्यापैकी बहुतेकांनी या छेत्रीची ११ क्रमांकाची जर्सी घातली होती. आता आपला आवडता खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करताना दिसणार नाही, अशी खदखद सर्व चाहत्यांच्या मनात होती.
छेत्रीने आधीच जाहीर केले होते की कुवेत विरुद्धचा विश्वचषक पात्रता सामना हा त्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील शेवटचा सामना असेल. यामुळे छेत्रीला शेवटचे मैदानावर पाहण्यासाठी चाहत्यांनी मैदानात तुफान गर्दी केली होती.
सामना खेळण्यासाठी सुनील छेत्री मैदानावर येताच चौफेर तिरंगा फडकायला सुरुवात झाली आणि 'छेत्री छेत्री'चा आवाज स्टेडियममध्ये घुमू लागला. स्टेडियममध्ये एक मोठे पोस्टर होते ज्यावर बंगाली भाषेत सोनार सुनील असे लिहिले होते. 'तोमे हृदय माझे राखबो' (गोल्डन सुनील, मी तुला माझ्या हृदयात ठेवीन.) याशिवाय इतर अनेक पोस्टरही झळकत होते, ज्यात सुनील छेत्रीचे कौतुक करण्यात येते होते.
गोलरक्षक गुरप्रीत सिंगच्या मागे उभा असलेला छेत्रीही मोठ्या आवाजात राष्ट्रगीत गाताना दिसला. तत्पूर्वी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष कल्याण चौबे आणि राज्याचे क्रीडामंत्री अरुप भट्टाचार्य यांनी त्याचे स्वागत केले.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी X वरील त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “सुनील छेत्रीचे एका नवीन प्रवासात स्वागत आहे. आजपासून तुमच्या आयुष्याचा एक नवीन टप्पा सुरू होत आहे. तू बंगालचा गोल्डन बॉय, भारतीय संघाचा कर्णधार, आशियाचा स्पोर्ट्स आयकॉन, जागतिक स्तरावर गोल करणारा आणि अनेक यश मिळवणारा खेळाडू आहेस. मला खात्री आहे की तु भविष्यातही खेळत राहशील".