SL vs AUS 2nd Test Galle : ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू स्टीव्ह स्मिथ आणि ॲलेक्स कॅरी यांनी शानदार कामगिरी केली आहे. या दोन्ही खेळाडूंनी शुक्रवारी (७ फेब्रुवारी) श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शतके झळकावली. स्मिथने आधी शतक पूर्ण केले. यानंतर कॅरीनेही शतक झळकावले. या सामन्याचा आज दुसरा दिवस आहे.
ऑस्ट्रेलियन खेळाडू कॅरीने कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. वृत्त लिहिपर्यंत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३०० धावांचा टप्पा ओलांडला होता. कॅरी आणि स्मिथ यांच्यात २२६ धावांची भागिदारी झाली होती.
वृत्त लिहिपर्यंत स्टीव्ह स्मिथने ११८ धावा केल्या होत्या. या खेळीत त्याने ८ चौकार आणि १ षटकार मारला. तर कॅरीने ११ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १२९ धावा केल्या होत्या.
या खेळीनंतर स्टीव्ह स्मिथने सचिन तेंडुलकर याचा एक मोठा विक्रम मोडला आहे. सर्वात कमी कसोटी डाव खेळून ३६ शतके करणारा स्मिथ दुसरा खेळाडू ठरला आहे. स्मिथने यासाठी २०६ डाव खेळले आहेत. तर सचिनने २१८ डाव खेळून ३६ वे कसोटी शतक केले होते. या यादीत रिकी पाँटिंग अव्वल स्थानावर आहे. पाँटिंगने २०० डावात ३६ शतके झळकावली होती. कुमार संगकारा तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने २१० डावात हा पराक्रम केला.
स्टीव्ह स्मिथ सर्वात जलद १७००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे. त्याने ४१० डावात हा पराक्रम केला. या यादीत स्मिथ नवव्या क्रमांकावर आहे. तर विराट कोहली अव्वल स्थानावर आहे. टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू कोहलीने ३६३ डावात ही कामगिरी केली होती. या यादीत हाशिम आमला दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ३८१ डावात ही कामगिरी केली.
गाले स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात यजमान श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर श्रीलंकेचे फलंदाज फारशी चांगली कामगिरी करू शकले नाहीत. श्रीलंकेचा पहिला डाव दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात २५७ धावांवर आटोपला.
श्रीलंकेच्या पहिल्या डावात दिनेश चंडीमलने ७४ धावांची खेळी केली तर कुसल मेंडिस ८५ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायन, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू कुहनेमन यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतले तर ट्रॅव्हिस हेडने एक विकेट घेतली आहे.
संबंधित बातम्या