Sri Lanka vs Australia, 2nd Test : ऑस्ट्रेलियनं संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिका खेळली जात आहे. या दौऱ्यावर पॅट कमिन्स याच्या अनुपस्थितीत स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करत आहे.
स्टीव्ह स्मिथने पहिल्याच सामन्यात आपल्या कसोटी कारकिर्दीत १० हजार धावांचा आकडा पूर्ण केला होता आणि सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत सुनील गावस्कर आणि युनिस खान यांना मागे टाकले होते.
आता या मालिकेतील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या (६ फेब्रुवारी) खेळात स्टीव्ह स्मिथने आणखी एक मोठी कामगिरी आपल्या नावावर केली आहे. तो आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारा खेळाडू बनला आहे.
स्टीव्ह स्मिथ आता ऑस्ट्रेलियन संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये नॉन-विकेटकीपर खेळाडू म्हणून सर्वाधिक झेल घेणारा क्षेत्ररक्षक बनला आहे. गाले स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या खेळात स्मिथने एकूण २ झेल घेतले. ज्यात त्याने प्रभात जयसूर्याचा झेल घेऊन रिकी पॉन्टिंगला मागे सोडले.
आता स्मिथच्या नावावर ११६ कसोटीत १९७ झेल आहेत. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर रिकी पाँटिंगचे नाव आहे, ज्याने १६८ कसोटी सामन्यात १९६ झेल घेतले.
या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात स्मिथ शतक झळकावण्यात यशस्वी ठरला होता. आता दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावातही त्याने अर्धशतक केले आहे. हे वृत्त लिहिपर्यंत तो ७० धावांवार खेळत आहे. तर ऑस्ट्रेलियाने ३ बाद १९६ धावा केल्या होत्या.
गाले स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात यजमान श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर श्रीलंकेचे फलंदाज फारशी चांगली कामगिरी करू शकले नाहीत. श्रीलंकेचा पहिला डाव दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात २५७ धावांवर आटोपला.
श्रीलंकेच्या पहिल्या डावात दिनेश चंडीमलने ७४ धावांची खेळी केली तर कुसल मेंडिस ८५ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायन, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू कुहनेमन यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतले तर ट्रॅव्हिस हेडने एक विकेट घेतली आहे.
संबंधित बातम्या