भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी कसोटी २६ डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर (MCG) सुरू झाली. आज सामन्याचा दुसरा दिवस आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज स्टीव्ह स्मिथ याने शानदार शतक झळकावले आहे, त्याच्या कसोटी करिअरचे हे ३४वे शतक आहे.
स्मिथने दमदार शतक झळकावून मेलबर्न क्रिकेट मैदानावर खळबळ उडवून दिली. आपले शतक पूर्ण करण्यासाठी स्मिथने १६७ चेंडूंचा सामना केला ज्यामध्ये त्याने ८ चौकार आणि २ षटकारही मारले. स्मिथने कसोटी क्रिकेटमधील ३४ वे शतक पूर्ण केले.
एवढेच नाही तर स्मिथने आपल्या शतकाच्या जोरावर भारताविरुद्ध मोठा विक्रम केला आहे. भारताविरुद्धच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक शतके झळकावणारा स्मिथ फलंदाज ठरला आहे. स्मिथचे हे भारताविरुद्धचे ११ वे कसोटी शतक होते.
कांगारू संघाकडून खेळताना त्याने भारताविरुद्ध २४ कसोटी सामन्यांमध्ये ही कामगिरी केली.
भारताविरुद्धच्या मेलबर्न कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी स्टीव्ह स्मिथने ६८ धावांवरून आपला डाव पुढे नेला. खेळाच्या सुरुवातीच्या तासात स्मिथने भारतीय गोलंदाजांचा धैर्याने सामना केला. स्मिथने केवळ खराब चेंडूंवर चौकार मारले आणि चांगल्या चेंडूंचा आदर केला. याशिवाय त्याला कर्णधार पॅट कमिन्सचीही उत्तम साथ लाभली.
स्मिथ आणि कमिन्स यांनी मिळून भारतीय गोलंदाजांविरुद्ध दमदार फलंदाजी करत १०० धावांची भागीदारी केली आणि संघाची धावसंख्या ४०० धावांच्या पुढे नेली.
खेळाच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना कांगारू संघाने दिवसअखेर ६ गडी गमावून ३११ धावा केल्या होत्या. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियन संघाने बॉक्सिंग डे कसोटीत दमदार सुरुवात केली होती.
संबंधित बातम्या