Steve Smith Stats, Records : चॅम्पियन्स ट्रॉफीमधील ऑस्ट्रेलियाचा प्रवास संपला आहे. त्याचवेळी आता ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने वनडे फॉरमॅटला अलविदा केला आहे. स्टीव्ह स्मिथ म्हणाला की, चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारताविरुद्धची उपांत्य फेरी ही माझी शेवटची वनडे होती. आता मी वनडे फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या जर्सीमध्ये दिसणार नाही.
स्टीव्हने स्मिथने त्याच्या शेवटच्या वनडे सामन्यात ७३ धावांची खेळी केली. त्याने ९६ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकार मारला. स्मिथला मोहम्मद शमीने क्लीन बोल्ड केले होते. शमीच्या फुलटॉस चेंडूवर स्मिथ बोल्ड झाला होता.
सामन्यानंतर स्मिथ म्हणाला होता, की फुलटॉस चेंडूवर बाद होणे, ही योग्य गोष्ट नाही. त्याच्या या वक्तव्यानंतरच तो रिटायर होणार, अशी चर्चा सुरू झाली होती. शेवटी त्याने आज (५ मार्च) सकाळी निवृत्तीची घोषणा केली.
विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाचा माजी विकेटकीपर फलंदाज अॅडम गिलख्रिस्ट यानेही त्याच्याकडून एका सामन्यात सोपा झेल सुटल्यानंतर लगेच निवृत्तीची घोषणा केली होती.
दरम्यान, आपण येथे स्टीव्ह स्मिथ याची कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० फॉरमॅटमधील कामगिरी पाहणार आहोत.
स्टीव्ह स्मिथने ११६ कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे. ज्यामध्ये त्याने ५६.७ च्या सरासरीने १०२७१ धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये, ३६ शतके झळकावण्याव्यतिरिक्त, स्टीव्ह स्मिथने ४१ वेळा पन्नास धावांचा टप्पा ओलांडला आहे. त्याने ४ द्विशतकेही झळकावली
याशिवाय स्टीव्ह स्मिथने वनडे फॉरमॅटमध्ये १६९ सामने खेळले आहेत. वनडे फॉरमॅटमध्ये स्टीव्ह स्मिथने ८७.१३ च्या स्ट्राइक रेटने आणि ४३.०६ च्या सरासरीने ५७२७ धावा केल्या. एकदिवसीय सामन्यांमध्ये १२ शतके झळकावण्याव्यतिरिक्त, त्याने ३४ वेळा ५० धावांचा टप्पा ओलांडला. या फॉरमॅटमध्ये स्टीव्ह स्मिथची सर्वोत्तम धावसंख्या १६४ धावा होती.
स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियाकडून ६७ टी-20 सामने खेळले. ऑस्ट्रेलियासाठी टी-20 सामन्यांमध्ये स्टीव्ह स्मिथने १२५.४६ च्या स्ट्राइक रेटने आणि २४.८६ च्या सरासरीने १०९४ धावा केल्या.
मात्र, स्टीव्ह स्मिथने वनडे फॉरमॅटला अलविदा केला. स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.
ऑस्ट्रेलियाच्या पराभवानंतर स्टीव्ह स्मिथच्या निवृत्तीच्या बातम्या सतत येत होत्या. पण आता खुद्द स्टीव्ह स्मिथनेच निवृत्तीची अधिकृत घोषणा केली आहे.
संबंधित बातम्या