सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज स्टीव्ह स्मिथ ९९ धावांवर नाही तर ९९९९ धावांवर बाद झाला. १० हजार कसोटी धावा पूर्ण करण्याची त्याची संधी अवघ्या एका धावेने हुकली.
भारताच्या १६५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्टीव्ह स्मिथ ९ चेंडूत ४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. स्मिथने ५ धावा केल्या असत्या तर त्याने १०००० कसोटी धावा पूर्ण केल्या असत्या, परंतु त्याला केवळ ९९९९ कसोटी धावांवरच पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. आता स्मिथला १० हजार कसोटी धावा पूर्ण करण्यासाठी पुढील मालिकेची वाट पाहावी लागणार आहे.
ऑस्ट्रेलिया संघ श्रीलंकेविरुद्ध पुढील कसोटी मालिका खेळणार आहे. उभय संघांमध्ये 2 सामन्यांची कसोटी मालिका 29 जानेवारीपासून सुरू होणार आहे. ही मालिका श्रीलंकेच्या यजमानपदावर खेळवली जाणार आहे.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ मध्ये स्टीव्ह स्मिथने २ शतके झळकावली. मालिकेतील पहिल्या दोन कसोटीत स्मिथ फ्लॉप दिसला. त्यानंतर स्मिथने तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत शतके झळकावली. मात्र, पुन्हा पाचव्या कसोटीत स्मिथच्या बॅटमधून एकही मोठी खेळी येऊ शकली नाही.
स्मिथने पाचव्या कसोटीच्या दोन्ही डावात ३३ आणि ४ धावा केल्या. या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा स्मिथ तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याने ५ सामन्यात ३४.८९ च्या सरासरीने ३१४ धावा केल्या.
स्टीव्ह स्मिथने आपल्या कसोटी कारकिर्दीत ११४ सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या २०४ डावांमध्ये त्याने ५५.८६ च्या सरासरीने ९९९९ धावा केल्या आहेत. या दरम्यान, त्याने ३४ शतके आणि ४१ अर्धशतके केली, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या २३९ धावा आहे. स्मिथने २०१० मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून कसोटी पदार्पण केले होते.