Steve Smith : स्टीव्ह स्मिथ जगातील महान फलंदाजांच्या यादीत; कसोटी क्रिकेटमध्ये ओलांडला मैलाचा टप्पा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Steve Smith : स्टीव्ह स्मिथ जगातील महान फलंदाजांच्या यादीत; कसोटी क्रिकेटमध्ये ओलांडला मैलाचा टप्पा

Steve Smith : स्टीव्ह स्मिथ जगातील महान फलंदाजांच्या यादीत; कसोटी क्रिकेटमध्ये ओलांडला मैलाचा टप्पा

Jan 29, 2025 02:30 PM IST

Steve Smith News : ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ यानं कसोटी क्रिकेटच्या इतिहासात स्वत:चं नाव कायमचं कोरून ठेवलं आहे. त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये १०,००० धावांचा टप्पा ओलांडला आहे.

Steve Smith : कसोटी क्रिकेटमध्ये स्टीव्ह स्मिथनं गाठला मैलाचा टप्पा; जगातील महान फलंदाजांच्या यादीत समावेश
Steve Smith : कसोटी क्रिकेटमध्ये स्टीव्ह स्मिथनं गाठला मैलाचा टप्पा; जगातील महान फलंदाजांच्या यादीत समावेश

Australia Cricket News : महान खेळाडूंच्या यादीत आपलं स्थान असावं असं प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. मग तो खेळ कोणताही असो. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथ यानंही ते स्पप्न पाहिलं आणि सत्यात उतरवलं. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये १०,००० धावांचा टप्पा त्यानं ओलांडला आहे. त्यामुळं तो जगातील १५ महान फलंदाजांच्या यादीत जाऊन बसला आहे.

गॉल इथं श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना प्रभारी कर्णधार स्टीव्ह स्मिथसाठी अत्यंत महत्त्वाचा होता. कारण, हा सामना सुरू होण्याआधी त्यांच्या नावावार ९९९९ कसोटी धावा होत्या. १० हजार धावा पूर्ण करण्यासाठी त्याला फक्त १ धाव हवी होती. ती लाखमोलाची धाव त्यानं घेतली आणि कसोटी क्रिकेटमध्ये १०,००० धावा करणारा तो केवळ चौथा ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला.

कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी दुपारच्या जेवणाआधीच त्यानं ही कामगिरी केली. प्रबाथ जयसूर्याच्या एका चेंडू लाँग ऑनला ढकलत त्यानं विक्रमी १ धाव घेतली. त्यानंतर स्मिथनं बॅट उंचावून प्रेक्षकांना अभिवादन केलं. प्रेक्षकांनी व त्याच्या संघ सहकाऱ्यांनी टाळ्याच्या कडकडाटात त्याला दाद दिली. 

२०५ डावांत १० हजार धावा

अवघ्या २०५ डावांत १०,००० धावांचा टप्पा गाठणारा स्मिथ हा पाचवा क्रिकेटपटू ठरला आहे. रिकी पाँटिंग हा सर्वात जलद १०,००० धावा करणारा ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे. त्यानं अवघ्या १९६ डावांत हा टप्पा गाठला आहे. सचिन तेंडुलकर, कुमार संगकारा आणि ब्रायन लारा या तीन फलंदाजांना हा टप्पा गाठण्यासाठी १९५ डाव लागले. भारतीय फलंदाज राहुल द्रविड याला १०,००० धावा करण्यासाठी २०६ डाव खेळावे लागले. 

चौथा ऑस्ट्रेलियन खेळाडू

कसोटीत १० हजार धावा करणारा स्टीव्ह स्मिथ हा चौथा ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे. स्मिथच्या आधी रिकी पाँटिंग, अ‍ॅलन बॉर्डर आणि स्टीव्ह वॉ यांनी ही कामगिरी केली आहे.

९९९० नंतर दोन वेळा झाला बाद

स्टीव्ह स्मिथ हा ९९९० पेक्षा जास्त धावा केल्या असताना दोनदा बाद झाला होता. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या शेवटच्या कसोटी मालिकेत असं झालं होतं. एकदा तर तो ९९९९ वर बाद झाला. पाच आकडी धावसंख्येच्या इतक्या जवळ असताना बाद झालेल्या मोजक्या बड्या क्रिकेटपटूंपैकी तो एक ठरला होता. ब्रायन लारा हा देखील ९९९० च्या पुढेमागे असताना दोनदा बाद झाला होता. या टार्गेटचा माझ्या मनावर काहीसा ताण होता. त्यामुळं लक्ष्य गाठण्यास थोडा उशीर झाला, अशी कबुलीही त्यानं दिली होती. अर्थात, स्मिथनं गॉलमध्ये कोणतीही चूक केली नाही.

कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणारे फलंदाज

कसोटी क्रिकेटमध्ये १०,००० किंवा त्याहून अधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या विशेष यादीत सचिन तेंडुलकर (१५,९२१), रिकी पाँटिंग (१३,३७८), जॅक कॅलिस (१३,२८९), राहुल द्रविड (१३,२८८), जो रूट (१२,९७२), ॲलिस्टर कुक (१२,४७२), कुमार संगकारा (१२,४००), ब्रायन लारा (११,९५३), शिवनारायण चंद्रपॉल (११,८६७), महेला जयवर्धने (११,८१४), ॲलन बॉर्डर (११,१७४), स्टीव्ह वॉ (१०,९२७), सुनील गावस्कर (१०,१२२), युनूस खान (१००९९) यांचा समावेश आहे. स्टीव्ह स्मिथ १५ वा फलंदाज ठरला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग