RCB Player Retirement : आरसीबीच्या दिग्गज खेळाडूची क्रिकेटमधून निवृत्ती; बोर्डाला पत्र लिहून केला कारणांचा खुलासा
RCB Player Retirement : विराट कोहलीच्या आरसीबीकडून खेळणाऱ्या दिग्गज खेळाडूने क्रिकेटमधून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. बोर्डाला पत्र लिहून खेळाडूने निर्णय जाहीर केला आहे.
Wanindu Hasaranga Retirement : विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा मुख्य गोलंदाज आणि श्रीलंकेचा स्टार अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगाने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. हसरंगा याने खुद्द याबाबतची माहिती श्रीलंकन बोर्डाला दिली असून निवृत्तीमागचं कारणही सांगितलं आहे. वानिंदू हसरंगा हा गेल्या अनेक वर्षांपासून श्रीलंकन संघासाठी भेदक गोलंदाजी करत आलेला आहे. तसेच आयपीएलमध्ये तो कोहलीच्या आरसीबी संघाकडून खेळतो. त्यामुळं आता हसरंगाने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतल्याने श्रीलंकन संघाला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.
ट्रेंडिंग न्यूज
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगाने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. परंतु वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये खेळत राहणार असल्याचं हसरंगाने श्रीलंकन बोर्डाला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. श्रीलंकन क्रिकेटमध्ये आणखी मोठं योगदान देण्यासाठी आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं वानिंदू हसरंगाने श्रीलंकन बोर्डाला पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. वानिंदू हसरंगा याची सूरज रणदीव आणि रंगना हेरथ या दिग्गज फिरकीपटूंशी तुलना केली जाते. त्यामुळं त्याने निवृत्ती घेतल्याने श्रीलंकेच्या संघाच्या गोलंदाजीत मोठं खिंडार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वनडे आणि टी-२० क्रिकेटममध्ये उत्कृष्ठ कामगिरी करत स्पेशालिस्ट गोलंदाज होण्याचं हसरंगाचं ध्येय आहे. त्यामुळं असलेल्या क्षमतांचा योग्य वापर करण्यासाठी मर्यादित षटकांच्या सामन्यांकडे त्याने लक्ष केंद्रित केलं आहे. त्यानंतर आता श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने हसरंगाच्या निवृत्तीचा निर्णय स्वीकारला असून व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहे. हसरंगा गेल्या अनेक हंगामांपासून आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळत आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये आरसीबी हसरंगाला रिलीज करणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं त्याच्या जागी कोणता नवा गोलंदाज येणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.