Sri Lanka vs Australia, 2nd ODI Scorecard : श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दोन वनडे सामन्यांची मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २८२ धावांचे लक्ष्य दिले आहे. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनी ५० षटकात ४ बाद २८१ धावा केल्या.
श्रीलंकेकडून कुसल मेंडिस (१०१) शतक आणि कर्णधार चरित असलंका (नाबाद ७८) आणि निशान मदुष्का (५१) यांनी दमदार फलंदाजी केली.
टॉस जिंकून प्रथम फलंदाजीस आलेल्या श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली नाही आणि ६व्या षटकात १५ धावांवर सलामीवीर पथुम निसांकाची (६) विकेट गेली. तो ॲरॉन हार्डीच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर फलंदाजीला आलेल्या कुसल मेंडिसने निशान मदुष्कासह डाव सांभाळला.
या दोन्ही फलंदाजांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी झाली. २५व्या षटकात बेन ड्वार्शविसने निशान मदुष्का (५१) याला बाद करून ही भागीदारी तोडली. यानंतर ॲडम झाम्पाने कुसल मेंडिसला मॅथ्यू शॉर्टकडे झेलबाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
कुसल मेंडिसने ११५ चेंडूत १५ चौकारांसह १०१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. कामिंडू मेंडिस (४) शॉन ॲबॉटच्या गोलंदाजीवर बाद झाला. कर्णधार चरिथ असलंका आणि जनित लियानागे यांनी अखेरच्या षटकांमध्ये तुफानी फलंदाजी करत श्रीलंकेला २८१ धावांपर्यंत मजल मारली.
चरित अस्लंकाने ६५ चेंडूंत ६ चौकार आणि ३ षटकारांसह (नाबाद ७८) धावा केल्या आणि जॅनित लियांगेने २१ चेंडूंत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने (नाबाद ३२) धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून बेन ड्वार्शविस, ॲरॉन हार्डी, शॉन ॲबॉट आणि ॲडम झाम्पा यांनी प्रत्येकी १ फलंदाज बाद केला.
संबंधित बातम्या