भारत आणि श्रीलंका यांच्यात वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळला आज (७ ऑगस्ट) जात आहे. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर श्रीलंकेचा कर्णधार चरिथ असलंका याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर श्रीलंकेने निर्धारित ५० षटकात ७ बाद २४८ धावा केल्या आहेत.
श्रीलंकेकडून अविष्का फर्नांडोने ९६ धावांची शानदार खेळी केली. त्याने ९ चौकार आणि २ षटकार मारले आहेत. कुसल मेंडिसने ५९ धावांची खेळी केली. त्याने ४ चौकार मारले. पथुम निसांका ४५ धावा करून बाद झाला. त्याने ५ चौकार आणि २ षटकार मारले. कामिंदू मेंडिस २३ धावा करून नाबाद राहिला.
एकवेळ श्रीलंकेने ३५ षटकांत १ गडी गमावून १६५ धावा केल्या होत्या. यानंतर श्रीलंका मोठी धावसंख्या उभारेल असे वाटत होते, पण भारतीय फिरकीपटूंनी जोरदार पुनरागमन केले. पण शेवटी कामिंडू मेंडिसने १९ चेंडूत २३ धावांची खेळी केली आणि श्रीलंकेला २४७ धावांपर्यंत पोहोचवले.
ऑफस्पिन अष्टपैलू रियान परागने ५४ धावांत ३ बळी घेतले. तर कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी १ विकेट मिळवला.
दरम्यान याआधी दोन्ही देशांमधील वनडे मालिकेतील पहिला सामना रोमहर्षकरित्या टाय झाला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात जेफ्री वँडरसेच्या किलर बॉलिंगच्या जोरावर श्रीलंकेने ३२ धावांनी विजय मिळवला. आता हा सामना जिंकून भारतीय संघाला मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल.
श्रीलंका प्लेइंग इलेव्हन- पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका (कर्णधार), जेनिथ लियानागे, कामिंदू मेंडिस, डुनिथ वेलालगे, महेश थीक्षाना, जेफ्री वेंडरसे, असिथा फर्नांडो.
भारत प्लेइंग इलेव्हन- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, रियान पराग, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.