भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना कोलंबो येथे खेळला जात आहे. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर श्रीलंकेचा कर्णधार चरिथ असलंका याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर श्रीलंकेने निर्धारित ५० षटकात २३० धावा केल्या आहेत. भारताला सामना जिंकण्यासाठी २३१ धावा करायच्या आहेत.
टीम इंडियाकडून सर्व गोलंदाजांनी तगडी गोलंदाजी केली. शुभमन गिल वगळता सर्व गोलंदाजांनी किमान एक विकेट घेतली. एकेकाळी श्रीलंकेचा संघ २०० धावांचा टप्पा गाठण्यासाठी धडपडत होता, पण खालच्या फळीतील फलंदाजांनी संघाला सांभाळले.
यजमान संघाकडून सर्वाधिक धावा २१ वर्षांच्या ड्युनिथ वेललागेने केल्या, त्याने ६४ चेंडूत ६६ धावा केल्या. त्याच्याशिवाय पथुम निसांकानेही ५६ धावांचे अर्धशतक झळकावून श्रीलंकेला सन्मानजनक धावसंख्या गाठण्यास मदत केली.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, जो तिसऱ्या षटकातच चुकीचा असल्याचे दिसून आले. मोहम्मद सिराजने अविष्का फर्नांडोला १ धावेवर बाद करून विरोधी संघाला पहिला धक्का दिला.
श्रीलंकेच्या फलंदाजीचा कणा असलेल्या कुसल मेंडिसलाही चांगली कामगिरी करता आली नाही, त्याला शिवम दुबेने १४ धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. सुरुवातीच्या धक्क्यांनंतर श्रीलंकेचा धावगती बराच मंदावला आणि २६व्या षटकात १०० धावा पूर्ण केल्या. त्याच वेळी, १०१ धावांवर यजमान संघाचे ५ फलंदाज बाद झाले.
श्रीलंकेने १०१ धावांवर ५ विकेट गमावल्या होत्या, परंतु त्यानंतर जेनिथ लियानागे, वानिंदू हसरंगा आणि दुनिथ वेल्लालगे यांनी छोट्या भागीदारी करत संघाला सांभाळले.
लियानागेने २० आणि हसरंगाने २४ धावांचे योगदान दिले. सहाव्या ते नवव्या फळीतील फलंदाजांनी मिळून एकूण १२३ धावा जोडल्या. विशेषतः, वेलालगेने एक टोक सांभाळून ठेवले, त्याने ६६ धावांची नाबाद खेळी खेळली आणि श्रीलंकेला २३० धावांपर्यंत नेले. वेल्लालगेने ७ चौकार आणि २ षटकार मारले.
संबंधित बातम्या