test cricket news marathi : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी सामन्यात श्रीलंका संघानं एक लाजिरवाणा विक्रम केला आहे. श्रीलंकेचा संपूर्ण संघ ८३ चेंडू खेळून अवघ्या ४२ धावांत ऑलआऊट झाला आहे. कसोटी इतिहासात इतकी खराब कामगिरी करणारा दुसरा संघ ठरला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात सर्वात कमी चेंडू खेळून ऑलआऊट होण्याचा विश्वविक्रम दक्षिण आफ्रिकेच्या नावावर नोंदवला गेला आहे. १०० वर्षांपूर्वी १९२४ मध्ये इंग्लंडनं दक्षिण आफ्रिका संघाला १२.३ षटकांत बाद केलं होतं. तेव्हा दक्षिण आफ्रिकेचा संघ ३० धावांवर ऑलआऊट झाला होता. त्यावेळी या संघानं एकूण ७५ चेंडू खेळले होते.
दक्षिण आफ्रिकेनंतर १९५५ मध्ये न्यूझीलंडचा संघ इंग्लंडविरुद्ध २६ धावांवर ऑलआऊट झाला होता. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात कमी धावसंख्या आहे. मात्र, एका डावात सर्वात कमी चेंडू खेळून ऑल आऊट होण्याचा विक्रम अद्यापही दक्षिण आफ्रिकेच्याच नावावर आहे. कारण श्रीलंकेनं त्यांच्यापेक्षा आठ चेंडू जास्त खेळले आहेत.
दक्षिण आफ्रिका १२.३ षटकांत म्हणजे ७५ चेंडूत ऑलआऊट झाला, तर श्रीलंकेनं या कसोटी सामन्यात १३.५ षटकं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीचा सामना केला आणि अशा प्रकारे त्यांनी एकूण ८३ चेंडू खेळले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात श्रीलंकेची ही सर्वात कमी कसोटी धावसंख्या आहे. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोणत्याही संघाची ही सर्वात कमी कसोटी धावसंख्या आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को जेन्सननं १३ धावांत ७ तर गेराल्ड कोएट्झीने दोन तर कागिसो रबाडानं एक विकेट घेतली.
दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील या कसोटी मालिकेवर टीम इंडियाचंही लक्ष आहे. या कसोटी मालिकेच्या निकालाचा परिणाम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याच्या समीकरणावरही होण्याची शक्यता आहे.