भारतीय संघ आणि श्रीलंका यांच्यातील ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना बुधवारी (७ ऑगस्ट) कोलंबोत खेळला गेला. यामध्ये भारतीय संघाचा ११० धावांनी दारुण पराभव झाला. तिसरा सामना जिंकून श्रीलंकेच्या संघाने घरच्या मैदानावर झालेली मालिका २-० अशी जिंकली आहे.
या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने २४९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात यजमान संघाच्या फिरकीपटूंनी असा सापळा रचला की संपूर्ण भारतीय संघ २६.१ षटकांत १३८ धावांत गारद झाला आणि सामन्यासह मालिकाही गमावली.
संघाकडून केवळ भारतीय कर्णधार रोहित शर्माला सर्वाधिक ३५ धावा करता आल्या.
वॉशिंग्टन सुंदरने ३०, विराट कोहलीने २० आणि रियान परागने १५ धावा केल्या. याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.
तर श्रीलंकेसाठी डावखुरा फिरकीपटू ड्युनिथ वेलालगे आणि लेगस्पिनर जेफ्री वँडरसे यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. वेलालगेने ५ बळी घेतले. तर जेफ्री आणि ऑफस्पिनर महिष तिक्षिना यांना २-२ विकेट मिळाले. वेगवान गोलंदाज असिथा फर्नांडोला १ बळी मिळाला.
दरम्यान याआधी दोन्ही देशांमधील वनडे मालिकेतील पहिला सामना रोमहर्षकरित्या टाय झाला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात जेफ्री वँडरसेच्या किलर बॉलिंगच्या जोरावर श्रीलंकेने ३२ धावांनी विजय मिळवला. आता हा सामना जिंकून श्रीलंकेने इतिहास रचला आहे.
श्रीलंकेने २७ वर्षांनंतर घरच्या मैदानावर इतिहास रचला आहे. १९९७ नंतर प्रथमच त्यांनी भारतीय क्रिकेट संघाला मायदेशात द्विपक्षीय वनडे मालिकेत पराभूत केले आहे. यापूर्वी ऑगस्ट १९९७ मध्ये अर्जुन रणतुंगाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेच्या संघाने सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा पराभव केला होता.
त्यावेळी श्रीलंकेने ४ वनडे सामन्यांची मालिका ३-० ने जिंकली. तर त्यावेळी एक सामना अनिर्णित राहिला होता.
भारतीय संघाने आतापर्यंत श्रीलंकेच्या भूमीवर यजमानांविरुद्ध एकूण १० द्विपक्षीय वनडे मालिका (सध्याच्या मालिकेसह) खेळल्या आहेत. यापैकी भारतीय संघाने ५ तर श्रीलंकेने ३ मालिका जिंकल्या आहेत. २ मालिका अनिर्णित राहिल्या.
श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात ७ बाद २४८ धावा केल्या होत्या. श्रीलंकेकडून अविष्का फर्नांडोने ९६ धावांची शानदार खेळी केली. त्याने ९ चौकार आणि २ षटकार मारले आहेत. कुसल मेंडिसने ५९ धावांची खेळी केली. त्याने ४ चौकार मारले. पथुम निसांका ४५ धावा करून बाद झाला. त्याने ५ चौकार आणि २ षटकार मारले. कामिंदू मेंडिस २३ धावा करून नाबाद राहिला.
एकवेळ श्रीलंकेने ३५ षटकांत १ गडी गमावून १६५ धावा केल्या होत्या. यानंतर श्रीलंका मोठी धावसंख्या उभारेल असे वाटत होते, पण भारतीय फिरकीपटूंनी जोरदार पुनरागमन केले. पण शेवटी कामिंडू मेंडिसने १९ चेंडूत २३ धावांची खेळी केली आणि श्रीलंकेला २४७ धावांपर्यंत पोहोचवले.
भारताकडून ऑफस्पिन अष्टपैलू रियान परागने ५४ धावांत ३ बळी घेतले. तर कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी १ विकेट मिळवला.