SRH Vs MI IPL 2024 Scorecard : आयपीएल २०२४ चा आठवा सामना आज (२७ मार्च) सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात मुंबईचा कर्मदार हार्दिक पांड्या याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर हैदराबादने निर्धारित २० षटकात ३ बाद २७७ धावांचा डोंगर उभारला आहे.
आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. यासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) ११ वर्षे जुना विक्रम मोडीत निघाला आहे. आरसीबीने २३ एप्रिल २०१३ रोजी पुणे वॉरियर्सविरुद्ध ५ गडी गमावून २६३ धावा केल्या होत्या. त्यावेळी ख्रिस गेलने ६६ चेंडूत १७५ धावांची शानदार खेळी केली होती.
तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या सनरायझर्स संघाने धमाकेदार सुरुवात केली. सर्वप्रथम ट्रॅव्हिस हेडने या मोसमातील सर्वात जलद अर्धशतक १८ चेंडूत केले. त्याने ९ चौकार आणि ३ षटकार मारले. या मोसमातील हेडचा हा पहिलाच सामना आहे. त्याने २४ चेंडूत ६२ धावा केल्या.
यानंतर अभिषेक शर्माने हा विक्रम मोडीत काढत १६ चेंडूत शानदार अर्धशतक ठोकले. शर्माने ६ षटकार आणि ३ चौकार मारले. अभिषेक शर्माने २३ चेंडूत ६३ धावांची खेळी केली. यानंतर, अखेरीस, हेनरिक क्लासेनने ३४ चेंडूत ७ षटकार आणि ४ चौकारांसह नाबाद ८० धावांची खेळी केली. तर एडन मार्करामने ४२ धावांची धमाकेदार खेळी करत संघाला ऐतिहासिक धावसंख्येपर्यंत नेले. मुंबईकडून हार्दिक पांड्या, जेराल्ड कोएत्झी आणि पियुष चावला यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
मुंबईसाठी पियुष चावला सर्वात महागडा ठरला. त्याने २ षटकात ३४ धावा दिल्या आणि १ बळी घेतला. मफाकाने ४ षटकात ६६ धावा दिल्या. शम्स मुलानीने २ षटकात ३३ धावा दिल्या. हार्दिक पांड्याने ४ षटकात ४६ धावा देत १ बळी घेतला. कोएत्झीने ४ षटकात ५७ धावा दिल्या. बुमराहने ४ षटकार ३६ धावा दिल्या.
संबंधित बातम्या