आयपीएलच्या १७ व्या मोसमात मुंबई इंडियन्सची सुरुवात खूपच खराब झाली आहे. आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. हैदराबादमध्ये बुधवारी (२७ मार्च) झालेल्या आयपीएलच्या आठव्या सामन्यात SRH ने मुंबई इंडियन्सचा ३१ धावांनी पराभव केला. या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पंड्या ड्रेसिंग रूममध्ये संघाला प्रोत्साहन देताना दिसला.
आयपीएल २०२४ मध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात हैदराबादने २० षटकात २७७ धावांची विक्रमी धावसंख्या उभारली. यानंतर चाहत्यांनी हार्दिक पांड्याला त्याच्या खराब कॅप्टन्सीमुळे सोशल मीडियावर तुफान ट्रोल केले.
मात्र, हार्दिक पंड्याने याकडे दुर्लक्ष करत ड्रेसिंग रुममध्ये संघाचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला. मुंबई इंडियन्सने याचा व्हिडिओ शेअर केला आहे.
यावेळी हार्दिक पांड्याने फलंदाज आणि गोलंदाजांना प्रोत्साहन देत त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. संघाला पाठिंबा देताना नवा कर्णधार म्हणाला की, सनरायझर्सचे फलंदाज सातत्याने धावा करत होते. पण आपण आपल्या जबाबदारीपासून पळ काढला नाही. प्रत्येकाने चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला.
हार्दिक म्हणाला, सर्वात मजबूत सैनिकांना सर्वात कठीण परीक्षेला सामोरे जावे लागते आणि आपण स्पर्धेतील सर्वात तगडा संघ आहोत. फलंदाजी करताना आपण जे काही साध्य केले आहे ते कौतुकास्पद आहे. आपल्या गोलंदाजांचा मला खरोखर अभिमान आहे. दिवस कठीण असतानाही मला कोणी पळताना दिसले नाही. प्रत्येकाला त्यांच्या हातात चेंडू हवा होता, मला वाटते की ही चांगली गोष्ट आहे. चला हे सुनिश्चित करूया की आपण एकमेकांना सतत मदत करू, काहीही झाले तरी आपण एकत्र राहू".
हैदराबादविरुद्ध मुंबईकडून तिलक वर्मा, ईशान किशन आणि रोहित शर्मा यांनी चांगली कामगिरी केली. यांच्या जोरावरच मुंबई लक्ष्याच्या जवळ पोहोचली. २७७ धावांच्या प्रत्युत्तरात मुंबईने २४६ धावा केल्या. दरम्यान, मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना १ एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्सशी होणार आहे.
संबंधित बातम्या