मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  SRH vs MI Highlights : आयपीएलचा ऐतिहासिक सामना... हैदराबादने सर्वात मोठी धावसंख्या उभारून मुंबईला हरवलं

SRH vs MI Highlights : आयपीएलचा ऐतिहासिक सामना... हैदराबादने सर्वात मोठी धावसंख्या उभारून मुंबईला हरवलं

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 27, 2024 11:22 PM IST

SRH vs MI Indian Premier League 2024 : आयपीएल २०२४ चा आठवा सामना हैदराबाद आणि मुंबई यांच्यात खेळला गेला. या सामन्यात हैदराबादने विजय मिळवला. हैदराबादचा हा यंदाच्या मोमसातील पहिलाच विजय आहे.

SRH vs MI Indian Premier League 2024
SRH vs MI Indian Premier League 2024 (PTI)

IPL 2024, MI Vs SRH Highlights :  पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादने (SRH) इतिहास रचला आहे. या संघाने बुधवारी (२७ मार्च) आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक २७७ धावांचा डोंगर उभारून सामना जिंकला. या सामन्यात SRH ने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा (MI) ३१ धावांनी पराभव केला.

या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून ५२३ धावांचा पाऊस पाडला. दोन्ही संघांच्या फलंदाजांनी या सामन्यात ३८ षटकार ठोकले. हा विक्रम आहे. याआधी एका टी-20 सामन्यात एवढ्या धावा कधीही झालेल्या नाहीत. तसेच, इतके षटकारदेखील एका सामन्यात यापूर्वी कधीही मारले गेले नाहीत.

मुंबईसमोर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठे २७८ धावांचे लक्ष्य होते, ज्याच्या प्रत्युत्तरात म्हणून एमआय संघ ५ गडी गमावून २४६ धावाच करू शकला आणि सलग दुसरा सामना गमावला. 

मुंबईसाठी तिलक वर्माने २४ चेंडूत अर्धशतक ठोकले आणि संघासाठी ३४ चेंडूत सर्वाधिक ६४ धावा केल्या. तर कर्णधार हार्दिक पांड्या (२४) आणि टीम डेव्हिड (नाबाद ४२) यांनी अखेरच्या काही चांगल्या खेळी खेळल्या, पण ते संघाला विजयापर्यंत नेऊ शकले नाहीत. 

सनरायझर्स संघाकडून कर्णधार पॅट कमिन्स आणि जयदेव उनाडकटने २-२ बळी घेतले. शाहबाज अहमदला १ विकेट मिळाला.

हैदराबादचा डाव

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या सनरायझर्स संघाने धमाकेदार सुरुवात केली. सर्वप्रथम ट्रॅव्हिस हेडने या मोसमातील सर्वात जलद अर्धशतक १८ चेंडूत केले. त्याने ९ चौकार आणि ३ षटकार मारले. या मोसमातील हेडचा हा पहिलाच सामना आहे. त्याने २४ चेंडूत ६२ धावा केल्या.

यानंतर अभिषेक शर्माने हा विक्रम मोडीत काढत १६ चेंडूत शानदार अर्धशतक ठोकले. शर्माने ६ षटकार आणि ३ चौकार मारले. अभिषेक शर्माने २३ चेंडूत ६३ धावांची खेळी केली. यानंतर, अखेरीस, हेनरिक क्लासेनने ३४ चेंडूत ७ षटकार आणि ४ चौकारांसह नाबाद ८० धावांची खेळी केली. तर एडन मार्करामने ४२ धावांची धमाकेदार खेळी करत संघाला ऐतिहासिक धावसंख्येपर्यंत नेले. मुंबईकडून हार्दिक पांड्या, जेराल्ड कोएत्झी आणि पियुष चावला यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.

IPL_Entry_Point