भारतात क्रिकेटला धर्माचा दर्जा देण्यात आला आहे. तसेच, क्रिकेट चाहतेदखील त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटूला देवाचा दर्जा देतात. असाच एक सीन सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. सोशल माीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक क्रिकेट चाहता टीव्हीसमोर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सची आरती करताना दिसत आहे.
आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अलीकडच्या काळात पॅट कमिन्सची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग जगभरात वाढली आहे. ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मिळवून दिल्यानंतर पॅट कमिन्सने कांगारू टीमला सहाव्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकून दिला. यानंतर आता पॅट कमिन्स आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व करत आहे. सनरायझर्स हैदराबादच्या चाहत्यांना त्याच्याकडून आयपीएल ट्रॉफीची अपेक्षा आहे.
IPL २०२४च्या २३ व्या सामन्यात मंगळवारी (९ एप्रिल) सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जचा २ धावांच्या फरकाने पराभव केला. मुल्लानपूर येथे झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना नितीश रेड्डी (६४) यांच्या खेळीच्या जोरावर २० षटकात ९ गडी गमावून १८२ धावा केल्या होत्या.
प्रत्युत्तरात पंजाब किंग्ज संघाला २० षटकांत ६ गडी गमावून १८० धावाच करता आल्या. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑरेंज आर्मीने चालू आयपीएलमध्ये तिसरा विजय नोंदवला.
त्याच वेळी, जर आपण आयपीएल २०२४ च्या पॉइंट टेबलकडे लक्ष दिले तर सनरायझर्स हैदराबाद संघ पाचव्या स्थानावर आहे. SRH ने आत्तापर्यंत ५ सामने खेळले आहेत, त्यापैकी फक्त ३ जिंकले आणि २ गमावले.
त्याचबरोबर शिखर धवनच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्ज संघ ५ सामन्यांत २ विजय आणि ३ पराभवांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे.
सध्याच्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स हा एकमेव संघ आहे ज्याने आतापर्यंतचे सर्व सामने जिंकले आहेत. ४ सामन्यांत ४ विजय मिळवून गुणतालिकेत ते अव्वल स्थानावर आहेत.
कोलकाता नाईट रायडर्स संघ ४ सामन्यात ३ विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे. लखनौ सुपरजायंट्सनेही चार सामन्यांमध्ये ३ विजय नोंदवले, परंतु ते नेट रनरेटच्या बाबतीत केकेआरच्या मागे आहेत आणि त्यामुळे ते तिसऱ्या स्थानावर आहेत. चेन्नई सुपर किंग्जने ५ सामन्यात ३ विजय मिळवत चौथ्या क्रमांकावर कब्जा केला आहे.