क्रिकेट... बॉल आणि बॅटमधील युद्ध जे २२-यार्डच्या खेळपट्टीवर खेळले जाते. ७० यार्डच्या वर्तुळात खेळल्या जाणाऱ्या या खेळात दररोज इतिहास घडतो. प्रत्येक सामन्यात नवे विक्रम होतात आणि मोडले जातात. या खेळात डॉन ब्रॅडमन, व्हिव्हियन रिचर्ड्स, सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर असे दिग्गज फलंदाज घडले, ज्यांनी आपल्या खेळाने कोट्यवधी लोकांना आपला चाहता बनवले.
या खेळात कपिल देव, इम्रान खान, डेनिस लिली, शेन वॉर्न आणि मुथय्या मुरलीधरन सारखे गोलंदाजही आले, ज्यांनी आपल्या गोलंदाजीने फलंदाजांना प्रचंड त्रास दिला आणि अनेक विक्रम बनवले.
पण वर्ल्ड क्रिकेटमध्ये असे दोन खेळाडू होते, जे वर सांगितलेल्यांप्रमाणे अव्वल दर्जाचे फलंदाज नव्हते किंवा चांगले गोलंदाजही नव्हते, परंतु तरीही या दोघांनी क्रिकेटची विचारसरणी, समज आणि दृष्टीकोन पूर्णपणे बदलून टाकला.
क्रिकेट हा केवळ बॉल आणि बॅटचा खेळ नसून त्याहूनही खूप काही आहे, हे या दोन खेळाडूंनी सिद्ध केले. आपण येथे त्याच दोन क्रांतिकारक क्रिकेटपटूंबाबत जाणून घेणार आहोत.
फलंदाजी आणि गोलंदाजीनंतर क्षेत्ररक्षण हा क्रिकेटमधील तिसरा आणि महत्त्वाचा विभाग आहे. आज क्रिकेटच्या मैदानात जय-पराजय क्षेत्ररक्षणावरदेखील ठरतो. चांगल्या क्षेत्ररक्षणामुळे संघ २० ते ३० धावा वाचवू शकतात आणि त्यामुळेही खूप मोठा फरक पडतो.
जेव्हा जेव्हा चांगल्या क्षेत्ररक्षणाची चर्चा होते तेव्हा सर्वांसमोर एकच नाव आणि चेहरा येतो... तो म्हणजे जॉन्टी ऱ्होड्स याचायय
पण जॉन्टी ऱ्होड्स मैदानात येण्यापूर्वीच क्षेत्ररक्षणात क्रांती सुरू झाली होती, आणि ती करणाऱ्या खेळाडूचे नाव होते गस लॉगी.
गस लोगी हा वेस्ट इंडिजचा खेळाडू होता, ज्याने ५२ कसोटी आणि १५८ एकदिवसीय सामने खेळले, परंतु तरीही फार कमी क्रिकेट चाहते त्याच्या नावाशी परिचित आहेत.
गस लोगीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत केवळ ३ शतके आणि ३० अर्धशतके झळकावली, परंतु तरीही या खेळाडूने आपल्या कारकिर्दीत असा पराक्रम केला ज्यामुळे संपूर्ण जगाच्या क्रिकेटची विचारसरणी बदलली.
उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी मॅन ऑफ द मॅच जिंकणारा गस लॉगी हा जगातील पहिला खेळाडू ठरला.
२८ ऑगस्ट १९८६ रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला. या सामन्याची इतिहासाच्या पानांमध्ये नोंद झाली जेव्हा गस लोगीने क्षेत्ररक्षणासाठी सामनावीराचा पुरस्कार जिंकला.
या सामन्यात लॉगीने ३ उत्कृष्ट झेल घेतले आणि २ फलंदाज धावबाद केले. म्हणजे त्याने निम्मा पाकिस्तानी संघ फिल्डिंगच्या बळावर पॅव्हेलियनमध्ये पाठवला, ही खरोखरच खास कामगिरी होती.
या सामन्यात गस लोगीने सलीम युसूफ, मुदस्सर नजर आणि इजाज अहमद यांसारख्या फलंदाजांचे उत्कृष्ट झेल घेतले आणि त्यासोबतच त्याने जावेद मियांदाद आणि आसिफ मुजतबा यांना धावबाद केले. त्यामुळे पाकिस्तानचा संघ अवघ्या १४३ धावांवर गारद झाला आणि वेस्ट इंडिजने ९ विकेट्सच्या मोठ्या फरकाने सामना जिंकला.
या सामन्यात गस लोगीला ना फलंदाजीची संधी मिळाली ना गोलंदाजी, तरीही तो सामनावीर ठरला.
गस लोगीने क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण क्रांतीची सुरुवात केली, तर ती दक्षिण आफ्रिकेचा क्षेत्ररक्षक जॉन्टी रोड्सने पुढे नेली. १९९२ च्या विश्वचषकात जॉन्टी ऱ्होड्सने पाकिस्तानचा फलंदाज इंझमाम उल हकला ज्या प्रकारे धावबाद केले ते आजही प्रत्येक क्रिकेट चाहत्यांच्या मनात आहे.
तथापि, एक क्षेत्ररक्षक म्हणून जॉन्टी ऱ्होड्सने अशी कामगिरी केली जी जगातील इतर कोणत्याही क्रिकेटपटूला करता आलेली नाही.
एका प्रथम श्रेणी सामन्यादरम्यान, जॉन्टी रोड्सला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही. मात्र, तो पर्यायी क्षेत्ररक्षक म्हणून मैदानात उतरला. जॉन्टी रोड्सने सामन्यात ७ उत्कृष्ट झेल घेतले आणि त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
एखाद्या खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान न मिळाल्याने सामनावीराचा पुरस्कार मिळाल्याची क्रिकेटच्या मैदानावरील ही एकमेव घटना आहे. मात्र, एका वनडेत सर्वाधिक ५ झेल घेण्याचा विक्रमही जॉन्टी रोड्सच्या नावावर आहे.
क्षेत्ररक्षक म्हणून आपल्या कारकिर्दीत जॉन्टीने केवळ दक्षिण आफ्रिकेसाठी सामने जिंकले नाहीत तर येणाऱ्या पिढ्यांना चांगले क्षेत्ररक्षक बनण्याची प्रेरणा दिली. यामुळेच आज प्रत्येक संघात एकाहून एक क्षेत्ररक्षक आहेत.
एकेकाळी कमकुवत क्षेत्ररक्षणासाठी कुप्रसिद्ध असलेली टीम इंडिया आज केएल राहुल, रवींद्र जडेजा, विराट कोहली, मनीष पांडे, संजू सॅमसन यांसारख्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षकांनी सज्ज आहे. आज जवळपास प्रत्येक संघात एक खास क्षेत्ररक्षक प्रशिक्षक असतो जो खेळाडूंना क्षेत्ररक्षणाच्या उत्कृष्ट टिप्स देतो आणि सामन्यातील प्रत्येक धाव वाचवण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देतो.
गस लोगी आणि जॉन्टी रोड्स या दोघांनी क्रिकेटच्या मैदानावर सामना फिरवण्याची एक वेगळी कला सुरू केली. अशा स्थितीत या दोघांना क्रिकेटचे क्रांतिकारक म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
संबंधित बातम्या