New Zealand vs South Africa, 2nd ODI Match : पाकिस्तानात सध्या तिरंगी मालिका खेळली जात आहे. या मालिकेत पाकिस्तान, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ खेळत आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज (१० फेब्रुवारी) दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळला जात आहे.
या सामन्यात आफ्रिकेचा सलामीवीर आणि डेब्यू सामना खेळणाऱ्या मॅथ्यू ब्रिट्झके याने शानदार शतक झळकावले. त्याच्या कारकिर्दीतील हा पहिलाच एकदिवसीय सामना होता आणि त्याने शानदार शतक झळकावले. मॅथ्यू ब्रिट्झकेने १२८ चेंडूत शतक झळकावले. या उजव्या हाताच्या फलंदाजाने १४८ चेंडूत १५० धावांची खेळी खेळली.
मॅथ्यू ब्रिट्झकेच्या शतकाच्या बळावर आफ्रिकेने या सामन्यात ५० षटकात ६ बाद ३०४ धावांचा डोंगर उभारला. आफ्रिकेकडून वियान मुल्दर यानेही ६४ धावांची खेळी केली.
मॅथ्यू ब्रिट्झकेचे हे शतकही खास आहे. कारण त्याच्या वनडे कारकिर्दीतील पहिल्याच सामन्यात परदेशात शतक झळकावणारा तो पहिला दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर ठरला आहे. एवढेच नाही तर पाकिस्तानमध्ये पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावणारा तो पहिला दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू आहे.
मॅथ्यू ब्रिट्झके अवघ्या २६ वर्षांचा असून त्याला कसोटी आणि टी-20 सामन्यांमध्ये संधी मिळाली आहे, परंतु तो फ्लॉप ठरला. आता दक्षिण आफ्रिकेने त्याच्यावर विश्वास व्यक्त केला आणि त्याला एकदिवसीय सामन्यात संधी दिली.
मॅथ्यू ब्रिट्झकेनेही त्याच्या शतकादरम्यान १४ वर्षांचा विक्रम मोडला. पदार्पणाच्या एकदिवसीय सामन्यात सर्वात मोठी खेळी खेळणारा तो दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू ठरला. २०१० साली दक्षिण आफ्रिकेच्या कॉलिन इंग्रामने पदार्पणाच्या सामन्यात १२४ धावांची खेळी केली होती. मॅथ्यू ब्रिट्झकेने ही धावसंख्या पार करताच हा विक्रमही आपल्या नावावर केला.
कॉलिन इंग्राम- १२४ धावा, २०१०, झिम्बाब्वेविरुद्ध
टेंबा बावुमा- ११३ धावा, २०१६ , आयर्लंडविरुद्ध
रीझा हेंड्रिक्स- १०२ धावा, २०१८ , श्रीलंकाविरुद्ध
मॅथ्यू ब्रेट्झके- १५० धावा, २०२५ न्यूझीलंडविरुद्ध
मॅथ्यू ब्रित्झकेने न्यूझीलंडविरुद्ध खूरच संथ सुरुवात केली. टेंबा बावुमा बाद झाल्यानंतर त्याने जेसन स्मिथसोबत अर्धशतकी भागीदारी केली. यावेळी तो खूपच बचावात्मक दिसला. मॅथ्यू ब्रेट्झकेने आपले अर्धशतक पूर्ण करण्यासाठी ६८ चेंडू खेळले. मात्र, यानंतर त्याने आपला डाव झपाट्याने पुढे नेत २ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले.
मॅथ्यू ब्रिट्झकेने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बांगलादेशविरुद्ध कसोटी पदार्पण केले आणि त्याला केवळ एक डाव खेळण्याची संधी मिळाली, ज्यामध्ये तो खातेही उघडू शकला नाही. टी-20 मध्येही या खेळाडूला १० सामन्यांमध्ये संधी मिळाली, तिथेही या खेळाडूला १६.७७ च्या सरासरीने केवळ १५१ धावा करता आल्या.
संबंधित बातम्या