SA vs IND Final Schedule : भारताने २०२२ च्या उपांत्य फेरीतील इंग्लंडकडून झालेल्या पराभवाचा बदला घेतला आहे. टीम इंडियाने गुरुवारी (२७ जून) टी-20 विश्वचषक २०२४ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंडचा ६८ धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल (२३ धावांत ३ विकेट) आणि चायनामन गोलंदाज कुलदीप यादव (१९ धावांत ३ विकेट) यांची घातक फिरकी गोलंदाजी हे भारताच्या विजयाचे नायक ठरले, तर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी फलंदाजीत कमाल केली.
आता टीम इंडिया शनिवारी (२९ जून) टी-20 वर्ल्डकप २०२४ च्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला भिडणार आहे. हा सामना बार्बाडोसमध्ये होणार आहे.
सामन्याची तारीख: २९ जून
वेळ: ८:०० PM IST
स्टेडियम: केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन, बार्बाडोस
नाणेफेक गमावल्यानंतर कर्णधार रोहित शर्माच्या (५७) सलग दुसऱ्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने २० षटकात ७ बाद १७१ केल्या. प्रत्युत्तरात इग्लंडचा संघ १०३ धावात गारद झाला. फिरकी गोलंदाजांच्या कामगिरीमुळे इंग्लंडचा संघ १६.४ षटकांत सर्वबाद झाला.
अक्षर आणि कुलदीपच्या प्रत्येकी ३ बळींशिवाय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १२ धावांत २ बळी घेतले. इंग्लंडचे दोन फलंदाज धावबाद झाले. अक्षर पटेलला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
बाद फेरीतील यापेक्षा दमदार विजय कोणता असू शकतो? प्रथम फलंदाजी करताना भारताने कठीण खेळपट्टीवर चांगली धावसंख्या उभारली आणि नंतर त्यांच्या फिरकीपटूंनी उर्वरित कामगिरी केली. अक्षरने पॉवरप्लेमध्ये इंग्लंडला ३ धक्के दिले. या धक्क्यांमधून इंग्लंड सावरू शकला नाही. भारतीय संघ ८ महिन्यांत दुसऱ्यांदा आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.
संबंधित बातम्या