महिला टी-20 विश्वचषक २०२४ चा पहिला उपांत्य सामना आज (१७ ऑक्टोबर) गतविजेता ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दुबई क्रिकेट स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, यानंतर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ विकेट गमावून १३४ धावा केल्या होत्या.
प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने १७.२ षटकात १३५ धावा करत सामना जिंकला. यासह आफ्रिकेने सलग दुसऱ्या टी-20 वर्ल्डकपची फायनल गाठली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या १३५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेने वेगवान आणि चांगली सुरुवात केली. सलामीला आलेल्या कर्णधार लॉरा वोल्वार्ड हिने वादळी सुरुवात केली. ताजमिन ब्रिट्ससोबत तिने पहिल्या विकेटसाठी ४ षटकात २५ धावा जोडल्या. ब्रिट्स १५ धावा करून बाद झाली. यानंतर अनेके बॉश आणि लॉराने धावांचा वेग कमी होऊ दिला नाही.
लॉरा वोल्वार्ड हिने ३७ चेंडूत ४२ धावा केल्या. तिने ३ चौकार आणि एक षटकार मारला. तर बॉशने नाबाद ७४ धावा फटकावल्या. तिने अवघ्या ४८ चेंडूत ८ चौकार आणि एक षटकार मारला. ऑस्ट्रेलियाकडून कोणतीच गोलंदाज चमत्कार करू शकली नाही. केवळ अॅनाबेल सदरलँडने २ विकेट घेतल्या.
ऑस्ट्रेलियाकडून बेथ मुनीने सर्वाधिक ४४ धावा केल्या. तर दक्षिण आफ्रिकेकडून अयाबोंगा खाका हिने २ बळी घेतले. मारिजन कॅप आणि नॉनकुलुलेको मलाबा यांनी १-१ बळी मिळवला. बेथ मुनी १७व्या षटकात धावबाद झाली. ऑस्ट्रेलियाचे टॉपचे फलंदाज या सामन्यात फ्लॉप ठरले. त्यामुळे त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
शेवटी एलिस पेरी आणि फिबी लिचफिल्ड यांनी चांगली फलंदाजी केली. त्यांच्यामुळेच ऑस्ट्रेलियाने १३४ धावांपर्यंत मजल मारली. पेरीने २३ चेंडूत ३१ तर लिचफिल्डने ६ चेंडूत १६ धावा फटकावल्या.
या वर्ल्डकपचा दुसरा उपांत्य सामना १८ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणार आहे.
ऑस्ट्रेलिया- ग्रेस हॅरिस, बेथ मुनी (विकेटकीपर), जॉर्जिया वेअरहॅम, ताहलिया मॅकग्रा (कर्णधार), एलिस पेरी, ऍशलेग गार्डनर, फोबी लिचफिल्ड, ॲनाबेल सदरलँड, सोफी मोलिनक्स, मेगन शुट, डार्सी ब्राउन.
दक्षिण आफ्रिका- लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, अनेके बॉश, मारिझान कॅप, क्लो ट्रायॉन, सुने लुस, नादिन डी क्लर्क, ॲनेरी डेर्कसेन, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), नॉनकुलुलेउको म्लाबा, अयाबोंगा खाका