South Africa In World test Championship Final : दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी मालिका खेळली जात आहे. या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात आफ्रिकेने पाकिस्तानचा २ गडी राखून पराभव केला. सेंच्युरियनमध्ये झालेला हा सामना अतिशय रोमहर्षक झाला. सामन्याच्या चौथ्या दिवशी आफ्रिकेने बाजी मारली.
या विजयासाह आफ्रिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे.
तत्पूर्वी, पाकिस्तानने पहिल्या डावात २११ आणि दुसऱ्या डावात २३७ धावा केल्या होत्या. तर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ३०१ धावा आणि दुसऱ्या डावात १५० धावा करत सामना जिंकला. दक्षिण आफ्रिकेसाठी एडन मार्करामने दमदार कामगिरी केली. तर कागिसो रबाडाने फलंदाजीत दमदार कामगिरी करून विजयाकडे नेले.
पाकिस्तानने पहिल्या डावात २११ धावा केल्या होत्या. या डावात बाबर आझम आणि शान मसूद यांच्यासह अनेक दिग्गज खेळाडू फ्लॉप ठरले. कामरान गुलामने ५४ धावांची खेळी केली होती.
दुसऱ्या डावातही संघ २३७ धावा करून सर्वबाद झाला. सौद शकीलने दुसऱ्या डावात आपली ताकद दाखवत ८४ धावा केल्या. बाबर आझमने ५० धावांची खेळी केली. याशिवाय कोणीही विशेष काही करू शकले नाही.
दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ३०१ धावा केल्या होत्या. यादरम्यान एडिन मार्करामने ८९ धावांची खेळी केली. त्याने १५ चौकार मारले. कॉर्बिन बॉशने ८१ धावांची नाबाद खेळी खेळली. त्याने १५ चौकारही मारले.
यानंतर चौथ्या डावात आफ्रिकेला विजयासाठी १४८ धावांचे लक्ष्य होते. पण दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात ९९ धावांवर ८ विकेट गमावल्या होत्या.
यानंतर कागिसो रबाडा आणि मार्को यानसेन यांनी संघाला तारले. रबाडाने नाबाद ३१ धावा केल्या. तर यानसेनने नाबाद १६ धावा केल्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने हा सामना २ गडी राखून जिंकला.