दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेविरुद्धची दोन कसोटी सामन्यांच्या मालिका २-० ने जिंकली. टेंबा बावुमाच्या नेतृत्वाखाली आफ्रिकेला हा विजय मिळाला. मालिकेतील पहिल्या कसोटीत आफ्रिकेने २३३ धावांनी विजय मिळवला. दुसऱ्या कसोटीत आफ्रिकेने १०९ धावांनी विजय मिळवला.
दरम्यान, आफ्रिकेचा कसोटी कर्णधार टेम्बा बावुमाचा कॅप्टन्सी रेकॉर्ड जबरदस्त आहे, तो पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
बावुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत एकही कसोटी गमावलेली नाही. बावुमाच्या नेतृत्वाखाली आफ्रिकेने आतापर्यंत ७ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात संघाने ६ जिंकले आहेत आणि उर्वरित एक सामना अनिर्णित राहिला. अशाप्रकारे बावुमाने आजपर्यंत कर्णधार म्हणून एकही कसोटी गमावलेली नाही.
कर्णधार असताना खेळल्या गेलेल्या कसोटीत बावुमाचा फलंदाजीचा रेकॉर्डही उत्कृष्ट आहे. कर्णधार म्हणून त्याने ७ सामन्यांच्या १२ डावात ५७.४५ च्या सरासरीने ६३२ धावा केल्या आहेत. या कालावधीत, त्याने २ शतके आणि ४ अर्धशतके केली आहेत, ज्यामध्ये सर्वोच्च धावसंख्या १७२ धावा आहे.
बावुमाने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आतापर्यंत ६१ कसोटी, ४२ एकदिवसीय आणि ३६ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटीच्या १०५ डावांमध्ये त्याने ३७.२७ च्या सरासरीने ३४२९ धावा केल्या आहेत. यात, त्याने ३ शतके आणि २४ अर्धशतके केली आहेत, ज्यामध्ये सर्वोच्च धावसंख्या १७२ धावा आहे.
याशिवाय त्याने एकदिवसीय सामन्यांच्या ४१ डावांमध्ये ४४.७५ च्या सरासरीने १६११ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ५ शतके आणि ४ अर्धशतके झळकावली, ज्यामध्ये सर्वोच्च धावसंख्या १४४ धावा होती. टी-20 इंटरनॅशनलच्या उर्वरित ३५ डावांमध्ये बावुमाच्या बॅटमधून ६७० धावा झाल्या आहेत. या कालावधीत त्याने १ अर्धशतक झळकावले आहे.
संबंधित बातम्या