SA vs WI T20 World Cup 2024 Match Highlights : दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा पराभव करून T20 विश्वचषक २०२४ च्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. डकवर्थ लुईस नियमानुसार आफ्रिकेने हा सामना ३ गडी राखून जिंकला. दोघांमध्ये चुरशीची लढत झाली, त्यात पावसानेही हस्तक्षेप केला. हा लो स्कोअरिंग सामना होता, ज्यामध्ये अतीतटीची लढत पाहायला मिळाली.
शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला ५ धावांची गरज होती. मार्को यानसेनने २० व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून आफ्रिकेला विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी, या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिजने २० षटकांत ८ गडी गमावून १३५ धावा केल्या.
दुसऱ्या डावात पाऊस सुरू झाला, त्यामुळे आफ्रिकेला १७ षटकांत १२३ धावांचे लक्ष्य देण्यात आले, जे संघाने १६.१ षटकांत पूर्ण केले. सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला, ज्यामध्ये दोन्ही संघांनी जीवाची बाजी लावली. पण शेवटी आफ्रिकेने बाजी मारली.
या विजयासह दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. इंग्लंडने आधीच उपांत्य फेरी गाठली आहे. गट २ मध्ये दक्षिण आफ्रिका ६ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. इंग्लिश संघ ४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिला.
दक्षिण आफ्रिकेच्या डावातील दुसऱ्या षटकात पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी आफ्रिकन संघाची धावसंख्या २ विकेटवर १५ धावा होती आणि ती संकटात सापडली होती. पण पाऊस थांबल्यानंतर खेळ पुन्हा सुरू झाला तेव्हा षटके कमी करण्यात आली आणि आफ्रिकेला सुधारित लक्ष्य मिळाले.
दक्षिण आफ्रिकेसाठी ट्रिस्टन स्टब्सने २७ चेंडूत ४ चौकारांच्या मदतीने २९ धावा केल्या. तर हेन्रिक क्लासेनने २२ धावांची खेळी केली.
दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी शेवटच्या षटकात ५ धावा करायच्या होत्या. ओबेड मॅकॉयच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मार्को यान्सनने षटकार ठोकत दक्षिण आफ्रिकेच्या संघाला विजय मिळवून दिला. यानसेनने नाबाद २१ धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून रोस्टन चेसने सर्वाधिक ३ बळी घेतले. आणि आंद्रे रसेल आणि अल्झारी जोसेफ यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने २० षटकांत ८ गड्यांच्या मोबदल्यात १३५ धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजसाठी रोस्टन चेसने ४२ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ५२ धावांची शानदार खेळी केली.
तर सलामीवीर फलंदाज काईल मेयर्सने ३४ चेंडूंत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३५ धावा केल्या. आंद्रे रसेल (१५) आणि अल्झारी जोसेफ (११*) यांनाही दुहेरी आकडा गाठण्यात यश आले. आफ्रिकेकडून चायनामन गोलंदाज तबरेझ शम्सीने २७ धावांत ३ बळी घेतले. तर केशव महाराज, मार्को यानसेन, कागिसो रबाडा आणि एडन मार्कराम यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
संबंधित बातम्या