England Vs South Africa Super 8 : टी-20 वर्ल्डकप २०२४ च्या सुपर ८ सामन्यात इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने होते. सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी क्रिकेट स्टेडिमयवर झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अवघ्या ७ धावांनी इंग्लंडला धुळ चारली.
शेवटच्या षटकात विजयासाठी १४ धावांची गरज होती, पण एनरिक नॉर्खियाने केवळ ६ धावा दिल्या. तसेच, या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सेट फलंदाज हॅरि ब्रुक बाद झाला. आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने धावत जाऊन शानदार झेल पकडला. या झेलमुळेच आफ्रिकन संघ सामना जिंकू शकला. लॉंग ऑफवर थांबलेला मार्करम सीमारेषेपर्यंत धावा गेला आणि डाइव्ह मारत झेल पकडला.
या विजयासह दक्षिण आफ्रिकेच्या उपांत्य फेरीच्या आशा बळकट झाल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेने सुपर ८ टप्प्यातील सलग दुसरा सामना जिंकून दोन सामन्यांतून दोन विजय मिळवून ४ गुणांसह गट दोनमध्ये अव्वल स्थान पटकावले. या पराभवानंतर इंग्लंडचा संघ दोन सामन्यांतून १ विजय आणि १ पराभवासह दोन गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
तत्पूर्वी, इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यानंतर दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद १६३ धावा केल्या. प्रत्युत्तरातरात इंग्लंडला ६ बाद १५६ धावाच करता आल्या.
आफ्रिकेच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खूपच खराब झाली आणि पहिल्या १० षटकांमध्ये इंग्लंडला धावांचा वेग वाढवता आला नाही. एके काळी इंग्लिश संघाची धावसंख्या ११ षटकात ४ विकेटच्या मोबदल्यात ६१ धावा होती, त्यानंतर हॅरी ब्रूक आणि लियाम लिव्हिंगस्टोनच्या ७८ धावांच्या भागीदारीने इंग्लंडला सामन्यात परत आणले, परंतु ते विजयासाठी अपुरे ठरले.
१० षटकांनंतर लियाम लिव्हिंगस्टोन आणि हॅरी ब्रूक यांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. इंग्लंडची धावसंख्या १४ षटकांत ४ गडी बाद ८७ धावा होती. ब्रूक आणि लिव्हिंगस्टोनने १५ व्या षटकापासून वेग पकडण्यास सुरुवात केली. दोघांनी मिळून ३ षटकांत ५२ धावा केल्या.
पण त्यानंतर १९व्या षटकात लिव्हिंग्स्टोन बाद झाला. त्यानंतर त्यान हॅरि ब्रुक दबावात आला आणि २०व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर झेल बाद झाला. इंग्लंडकडून ब्रूकने ३७ चेंडूत ५३ धावांची खेळी खेळली. तर लिव्हिंग्स्टोनने १७ चेंडूत ३३ धावा केल्या. त्याने ३ चौकार आणि २ षटकार मारले.
आफ्रिकेकडून कागिसो रबाडा आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी २ विकेट घेतले.
बॅटिंग पीचवर प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर क्विंटन डी कॉकने दक्षिण आफ्रिकेला स्फोटक सुरुवात करून दिली. एकवेळ धावसंख्या बिनबाद ८६ धावा होती. अशा स्थितीत आफ्रिकन संघ २०० चा पल्ला सहज पार करेल असे वाटत होते, पण मधल्या फळीतील फ्लॉप शोमुळे मोठी धावसंख्या उभारता आली नाही. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक ३ बळी घेतले.
दक्षिण आफ्रिकेसाठी क्विंटन डी कॉकने केवळ ३८ चेंडूत ६५ धावांची खेळी केली. त्याच्या बॅटमधून ४ चौकार आणि ४ षटकार आले. अखेरीस, डेव्हिड मिलरने २८ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने महत्त्वपूर्ण ४३ धावा केल्या. या दोघांशिवाय दक्षिण आफ्रिकेच्या एकाही फलंदाजाला इंग्लिश गोलंदाजांचा सामना करता आला नाही. रीझा हेंड्रिक्स २५ चेंडूत १९ धावा, हेनरिक क्लासेन १३ चेंडूत ८ धावा आणि एडन मार्कराम २ चेंडूत १ धावा काढून बाद झाले.
क्विंटन डीकॉक बाद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने ठराविक अंतराने विकेट गमावल्या, परंतु मिलरने डाव सावरला आणि संघाची धावसंख्या १६० धावांच्या पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.