बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याच्या घरात चोरीची घटना घडली आहे. गांगुलीच्या कोलकात्याच्या घरातून त्याचा मोबाईल चोरीला गेला आहे. याप्रकरणी गांगलीने शनिवारी (१० फेब्रुवारी) ठाकूरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
सौरव गांगुलीने फोनमध्ये आपली काही वैयक्तिक माहिती असल्याचे सांगत पोलिसांकडे तक्रार नोंदवाताना चिंता व्यक्त केली. चोरीची घटना घडली तेव्हा गांगुली घरापासून दूर होता. शनिवारी तो फोन घरात एका विशिष्ट ठिकाणी सोडला होता आणि तेव्हापासून तो बेपत्ता असल्याचे त्याने सांगितले.
सौरव गांगुलीच्या घरात सध्या पेंटिंगचे काम सुरू आहे. यानंतर आता गांगुलीच्या घरात काम करणाऱ्या कामगारांची चौकशी होण्याची शक्यता आहे. गांगुलीने शनिवारी ठाकूरपूर पोलिस स्टेशनच्या स्टेशन प्रभारींना पत्र लिहून घरातून मोबाईल फोन बेपत्ता झाल्याची माहिती दिली.
फोन हरवणं ही गांगुलीसाठी खूप मोठी बाब आहे कारण अनेक लोकांचा तो ॲक्सेस आहे आणि बरीच महत्त्वाची माहिती फोनमध्ये आहे. त्याचा फोन नंबर त्याच्या बँक खात्याशी लिंक आहे आणि अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचे नंबर त्याच्या मोबाईलमध्ये सेव्ह असल्याचे गांगुलीने सांगितले.
तसेच, गांगुलीने पोलिसांना फोन ट्रेस करण्याची आणि फोनचा डेटा कोणत्याही परिस्थितीत उघड होणार नाही याची, काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.