भारतीय क्रिकेटमधील महान कर्णधारांपैकी एक असलेल्या सौरव गांगुलीचा आज (८ जुलै) वाढदिवस आहे. ५२ वा वाढदिवस साजरा करणाऱ्या भारतीय क्रिकेटच्या 'दादा'ला जागतिक क्रिकेटमध्ये भरभरून प्रेम मिळाले आहे. या महान क्रिकेटरचा वाढदिवस त्याच्या जगभरातील चाहत्यांसाठी एखाद्या उत्सवापेक्षा कमी नाही.
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील बेहाला येथे ८ जुलै १९७२ रोजी एका श्रीमंत कुटुंबात सौरव गांगुलीचा जन्म झाला. सौरवला त्याच्या पहिल्या परदेश दौऱ्यात रॅगिंगला सामोरे जावे लागले होते.
वरिष्ठ खेळाडूंच्या वागणुकीमुळे गांगुलीला प्रचंड धक्का बसला. २०१८ मध्ये रिलीज झालेल्या 'अ सेंच्युरी इज नॉट इनफ' या चरित्रात सौरवने त्याच्या संघर्षाची कहाणी अतिशय मनोरंजक पद्धतीने मांडली आहे.
१९९१-९२ च्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यात संजय मांजरेकर यांनी गांगुलीला चांगलेच खडसावले होते. खरे तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जवळपास प्रत्येक भारतीय फलंदाज अपयशी ठरत होता. मुंबईचा संजय मांजरेकर पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या चमकदार कामगिरीनंतर देशाचा उगवता स्टार फलंदाज बनला होता, पण ऑस्ट्रेलियात त्याची प्रतिमा खराब झाली.
या खराब इमेजचा राग मांजरेकरांनी सौरव गांगुलीवर काढला. त्यावेळी गांगुली संघात नवखा होता. अशा स्थितीत मांजरेकर यांनी गांगुलीला आपल्या खोलीत बोलावून सांगितले, 'तुझा दृष्टिकोन सुधारा, नाहीतर मी तुला सुधारेन. नीट वागायला सुरुवात करा.'
संजय मांजरेकर यांच्या या फटकारामुळे गांगुली अनेक दिवस त्रस्त होता. संपूर्ण दौऱ्यात गांगुलीला एकही सामना खेळायला मिळाला नाही. गांगुलीच्या कारकिर्दीचे हे सुरुवातीचे दिवस होते, त्यामुळे तो मांजरेकरांना इच्छा असूनही उत्तर देऊ शकला नाही.
सौरवने त्याच्या आत्मचरित्रात लिहिले आहे की, 'मांजरेकरांना माझ्यावर इतका राग आला, असे नेमकं काय झाले असावे, असे मला वाटायचे.' सौरव गांगुलीला तत्कालीन दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांचा रूममेट बनवण्यात आले होते.
'दादा'ही 'कर्नल'समोर तोंड उघडत नसत, त्यामुळे तो त्यांच्याच खोलीपेक्षा त्याच्या वयाच्या सचिन तेंडुलकरच्या खोलीत जास्त वेळ घालवत असे.
कोलकाताचा प्रिन्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या सौरव गांगुलीने पुढील पिढीतील क्रिकेटपटूंना सुपरस्टार बनण्याची प्रेरणा दिली. युवराज सिंग, झहीर खान, हरभजन सिंग आणि एमएस धोनी हे काही खेळाडू आहेत, ज्यांना त्याने २००० च्या दशकाच्या सुरुवातीला संघात संधी दिली. या प्रभावी पदार्पणाने त्यांच्या भविष्यातील यशाचा टप्पा निश्चित केला आणि हे सर्व खेळाडू भारतीय क्रिकेटचे मजबूत आधारस्तंभ बनले.
संबंधित बातम्या