भारतीय क्रिकेट संघाच्या नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू आहे. पुढील महिन्यापासून T20 विश्वचषक सुरु होत आहे. या विश्वचषकानंतर संघाचे विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपणार आहे. यानंतर संघाला नवा प्रशिक्षक मिळेल.
प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मे होती. आता बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाबाबत चर्चा करणार आहे. दरम्यान, भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी प्रशिक्षक निवडीबाबत बीसीसीआयला एक सल्ला दिला आहे.
गांगुली हे बीसीसीआयचे अध्यक्ष राहिले असून त्यांच्या कार्यकाळात राहुल द्रविडला टीम इंडियाचे प्रशिक्षक बनवण्यात आले होते. २०२१ च्या टी-20 विश्वचषकानंतर राहुल द्रविडला ही जबाबदारी देण्यात आली होती. गांगुली आता आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्समध्ये काम करत आहे.
गांगुलीने X वर एक पोस्ट लिहिली आहे, ज्यात त्याने म्हटले आहे की प्रशिक्षक निवडताना हे लक्षात ठेवले पाहिजे की त्याचा खेळाडूच्या कारकिर्दीवर खूप खोल प्रभाव पडतो.
गांगुलीने लिहिले की, "कोचची आयुष्यात मोठी भूमिका असते, तो एखाद्या व्यक्तीला मार्गदर्शन करतो, त्याचे प्रशिक्षण मैदानावर तसेच, मैदानाबाहेर खेळाडूचे भविष्य तयार करत असते. त्यामुळे प्रशिक्षक अत्यंत शहाणपणाने निवडणे गरजेचे आहे."
दरम्यान, सोशल मीडिया युजर्स सौरव गांगुलीच्या या पोस्टला गौतम गंभीरसोबत जोडत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'हे भारतीय प्रशिक्षक म्हणून गंभीरच्या नियुक्तीविरोधात केलेले ट्विट असल्याचे दिसते. तसेच, त्याने केकेआर आयपीएल जिंकल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी एकही ट्विट केले नाही.
त्याचवेळी आणखी एका युजरने लिहिले की, 'गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक होणार अशी अटकळ बांधली जात आहे आणि तुम्ही म्हणता की प्रशिक्षकाची निवड काळजीपूर्वक करावी. गंभीरच्या प्रशिक्षक होण्याच्या विरोधात आहात का?
विशेष म्हणजे, दादा या नावाने प्रसिद्ध असलेल्या गांगुलीने स्वतः टीम इंडियासाठी प्रशिक्षकाची निवड केली आहे. गांगुली हा सचिन तेंडुलकर आणि लक्ष्मण यांच्यासोबत CAC चा भाग होता. तेव्हा त्यांनी अनिल कुंबळे आणि रवी शास्त्री यांची कोच म्हणून निवड केली होती.
राहुल द्रविडनंतर व्हीव्हीएस लक्ष्मण याला प्रशिक्षकपदाचा दावेदार मानले जात होते. पण आता तो या शर्यतीत दिसत नाही. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी रिकी पाँटिंग आणि जस्टिन लँगर यांच्याशी चर्चा केल्याचे वृत्त होते, पण नंतर जय शाह यांनी या गोष्टींचा इन्कार केला होता.
यानंतर आता गौतम गंभीरचे प्रशिक्षक बनणे जवळपास निश्चित झाले आहे, असे बोलले जात आहे. पण याबाबत गंभीर किंवा बीसीसीआयने अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही. सोबतच, गंभीरने या पदासाठी अर्ज केला आहे की नाही हेही समोर अलेले नाही.
संबंधित बातम्या