भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) काही खेळाडूंवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. या नाराजीचे कारण, खेळाडूंचे रणजी क्रिकेटला महत्व देणे, हे आहे. वास्तविक, भारतात सध्या रणजी क्रिकेटचे सीझन सुरू आहे. पण काही खेळाडू टीम इंडियातून बाहेर असूनही रणजी क्रिकेटमध्ये सहभागी होत नाही आहेत, त्यामुळे या खेळांडूवर बीसीसीआयने नाराजी व्यक्त केली आहे.
एकीकडे चेतेश्वर पुजारा, संजू सॅमसन आणि अजिंक्य रहाणेसारखे खेळाडू भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी मेहनत घेत आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेक जण शतके झळकावत आहेत तर काही युवा खेळाडू संघाबाहेर असूनही प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत नाहीत.
यानंतर आता रणजी ट्रॉफीपासून दूर राहणाऱ्या या खेळाडूंवर बीसीसीआय नाराज असून, अशा खेळाडूंवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे.
बीसीसीआयला खेळाडूंना सांगायचे आहे की, ते फिट असतील कर त्यांनी रणजी ट्रॉफीमध्ये त्यांच्या राज्य संघाकडून खेळावे. अनफिट खेळाडूंनी पुनर्वसनासाठी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत जावे.
विशेष म्हणजे, काही खेळाडू जानेवारीपासूच आयपीएल मोडमध्ये आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत या सर्व खेळाडूंना रणजी करंडक स्पर्धेत राज्य संघाकडून खेळण्यासाठी नोटीस पाठवण्यात येणार आहे. यात जे खेळाडू राष्ट्रीय कर्तव्यावर आहेत, अनफिट आहेत किंवा NCA मध्ये पुनर्वसन करत आहेत त्यांनाच सूट दिली जाईल.
यामध्ये सर्वात जास्त चर्चा इशान किशनची होत आहे. इशान फिट आहे आणि टीम इंडियातून बाहेर आहे. पण तरी तो रणजी क्रिकेट खेळण्यास इच्छूक नाही. तो आयपीएलची तयारी करत आहे. तो हार्दिक पंड्यासोबत बडोद्यात सराव करताना दिसला.
त्याआधी त्याने, आफ्रिका दौऱ्यावरून ब्रेक मागितला होता. तेव्हापासून तो टीम इंडियातून बाहेर आहे. या दरम्यान, ईशान किशनवर हेड कोच राहुल द्रविड नाराज असल्याचे उघड झाले. द्रविडने त्याला रणजी खेळण्याचा सल्ला दिला होता. पण त्याने तो ऐकला नाही. यानंतर आता राष्ट्रीय संघात परतणे ईशानसाठी कठीण दिसत आहे.