देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत दुलीप ट्रॉफी २०२४ मध्ये अनेक खेळाडू आपले कौशल्य दाखवत आहेत. भारत अ आणि भारत ब यांच्यातील सामना अतिशय रोमांचक झाला. हा सामना दमदार ॲक्शनने भरलेला होता. या सामन्याच्या चौथ्या दिवशी वादाचे दृश्य पाहायला मिळाले. रियान पराग आणि यश दयाल यांच्यात वाद झाला. या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
चौथ्या दिवशी धावांचा पाठलाग करताना भारत फलंदाज मयंक अग्रवाल यश दयालच्या चेंडूवर लवकर बाद झाला. यानंतर रियान पराग क्रिजवर आला आणि आक्रमक फलंदाजीला सुरुवात केली.
रियानने यश दयालच्या चेंडूवर चौकार आणि षटकार मारले, जे यशला अजिबात आवडले नाही. यानंतर डावाच्या ७व्या षटकात रियान पराग यश दयालच्या चेंडूवर मोठा शॉट खेळायला गेला आणि त्याच चेंडूवर तो बाद झाला.
यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतताना यश दयाल रियान परागच्या जवळ जातो आणि आपली आक्रमकता दाखवतो. यावर रियाननेही त्याच्याकडे खुन्नस देत पाहिले.
भारत अ विरुद्ध भारत ब सामन्यात रियान परागची जादू फारशी चालली नाही. भारत अ संघाकडून पहिल्या डावात रायनने ६४ चेंडूत केवळ ३० धावा केल्या. यानंतर धावांचा पाठलाग करताना रियान परागने दुसऱ्या डावात आक्रमक खेळण्याचा प्रयत्न केला मात्र तो या नादात बाद झाला. दुसऱ्या डावात रियान पराग १८ चेंडूत झटपट ३१ धावा करू शकला. ज्यामध्ये १ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता.
पहिल्या डावात भारत ब संघ ११६ षटकांत ३२१ धावा करून सर्वबाद झाला होता. लक्ष्याचा पाठलाग करताना भारत अ संघ ७२.४ षटकांत २३१ धावांत सर्वबाद झाला. भारत ब संघाला १९ धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात भारत ब संघ ४२ षटकांत १८४ धावा करून सर्वबाद झाला.
चौथ्या दिवशी लक्ष्याचा पाठलाग करताना भारत अ संघ ५३ षटकांत १९८ धावा करून सर्वबाद झाला. यानंतर भारत ब हा सामना ७६ धावांनी जिंकण्यात यशस्वी ठरला.