भारत आणि वेस्ट इंडिज महिला संघांमधील पहिला वनडे सामना बडोद्यात खेळवला जात आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार हेली मॅथ्यूजने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने ५० षटकांत ९ गडी गमावून ३१४ धावा केल्या. भारताकडून सलामीला आलेल्या स्मृती मानधनाने १०२ चेंडूत ९१ धावांची खेळी केली.
तिने आपल्या खेळीत १३ चौकार मारले. वास्तविक स्मृती मंधानाचे शतक हुकले, पण या खेळीमुळे भारतीय संघाने मोठी धावसंख्या उभारली.
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. भारतासाठी सलामीला आलेले स्मृती मानधना आणि प्रतिका रावल यांनी २३.३ षटकात ११० धावा जोडल्या. प्रतिका रावल ६९ चेंडूत ४० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. यानंतर हरलीन देओल फलंदाजीला आली आणि तिने ५० चेंडूत ४४ धावा केल्या.
तर भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर २३ चेंडूत ३४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. भारतीय संघाची यष्टिरक्षक फलंदाज ऋचा घोषने शेवटच्या षटकांमध्ये १३ चेंडूत २६ धावांची तुफानी खेळी केली. तर अष्टपैलू दीप्ती शर्माने १२ चेंडूत १४ धावा केल्या.
तर, वेस्ट इंडिजसाठी जाडा जेम्स ही सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. जाडा जेम्सने ८ षटकांत ४५ धावांत 5 फलंदाज बाद केले. याशिवाय कॅरेबियन कर्णधार हेली मॅथ्यूजला २ विकेट मिळाले. डिआंड्रा डॉटिनने १ बळी घेतला.
याआधी भारतीय संघाने ३ टी-20 सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिजचा २-१ ने पराभव केला होता. मात्र, आता दोन्ही संघ एकदिवसीय मालिकेत आमनेसामने आहेत. यानंतर २४ डिसेंबर रोजी दोन्ही संघ दुसऱ्या वनडेसाठी आमनेसामने येतील.
संबंधित बातम्या