SL Vs SA Highlights : टी-20 विश्वचषकात आफ्रिकेची विजयी सुरुवात, श्रीलंकेचा लाजिरवाणा पराभव
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  SL Vs SA Highlights : टी-20 विश्वचषकात आफ्रिकेची विजयी सुरुवात, श्रीलंकेचा लाजिरवाणा पराभव

SL Vs SA Highlights : टी-20 विश्वचषकात आफ्रिकेची विजयी सुरुवात, श्रीलंकेचा लाजिरवाणा पराभव

Jun 03, 2024 11:18 PM IST

SL Vs SA Highlights, T20 World Cup 2024 : आफ्रिकन गोलंदाजांसमोर श्रीलंकन फलंदाज १९.१ षटकात अवघ्या ७७ धावांवर गारद झाले. प्रत्युत्तरात आफ्रिकेने १६.२ षटकात पूर्ण केले.

Sri Lanka vs South Africa T20 World Cup 2024
Sri Lanka vs South Africa T20 World Cup 2024 (AP)

Sri Lanka Vs South Africa Scorecard : टी-20 विश्वचषक २०२४ चा चौथा सामना (३ जून) श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेला. न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आफ्रिकेने श्रीलंकेचा ६ विकेट्सनी धुव्वा उडवला.

श्रीलंकेचा कर्णधार वानिंदू हसरंगाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण श्रीलंकेचा हा निर्णय चुकीचा ठरला. आफ्रिकन गोलंदाजांसमोर श्रीलंकन फलंदाज १९.१ षटकात अवघ्या ७७ धावांवर गारद झाले. प्रत्युत्तरात आफ्रिकेने ४ गड्यांच्या मोबदल्यात १६.२ षटकात पूर्ण केले.

तत्पूर्वी, हे लक्ष्य गाठताना आफ्रिकन फलंदाजांनाही चांगलीच कसरत करावी लागली. दक्षिण आफ्रिकेने पॉवरप्ले ओव्हर्समध्ये रीझा हेंड्रिक्स आणि एडन मार्कराम यांच्या विकेट्स गमावल्या होत्या. पॉवरप्ले षटक संपेपर्यंत दक्षिण आफ्रिकेने २ गडी गमावून केवळ २७ धावा केल्या होत्या. 

दरम्यान, क्विंटन डी कॉक आणि ट्रिस्टन स्टब्स यांच्यात २८ धावांची भागीदारी झाली, जी दिसायला लहान असली तरी सामन्यानुसार खूप महत्त्वाची होती. संघाने १० षटकात २ गडी गमावून ४७ धावा केल्या होत्या आणि संघाला विजयासाठी ६० चेंडूत ३१ धावांची गरज होती.

डी कॉक सेट झाला होता आणि त्याने २० धावा केल्या होत्या, पण वानिंदू हसरंगाने त्याला बाद करून सामन्यात उत्साह वाढवला. हसरंगाच्या चेंडूवर ट्रिस्टन स्टब्सही १३ धावा करून बाद झाला, तिथूनच सामना फसल्याचे वाटत होते, पण यानंतर हसरंगाच्या षटकात ११ धावा आल्या, त्यामुळे श्रीलंकेच्या विजयाच्या सर्व आशा संपुष्टात आल्या. डेव्हिड मिलरने १७व्या षटकात चौकार मारून २२ चेंडू शिल्लक असताना दक्षिण आफ्रिकेचा विजय निश्चित केला.

दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका सामना कसोटी सामना असल्यासारखे वाटले. कारण खेळपट्टीवर चौकार-षटकार मारणे कठीण जात होते. फलंदाजांच्या संघर्षाचं वर्णन करायचं तर श्रीलंकेच्या डावात फक्त ३ षटकार आले आणि दक्षिण आफ्रिकेच्या डावातही ३ षटकार मारले गेले.

श्रीलंकेचा डाव

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेची सुरुवात खूपच खराब झाली. पथुम निसांका ३ धावा करून बाद झाला. यानंतर संपूर्ण फलंदाजीची फळी कोलमडली. ॲनरिक नॉर्खियाने कहर केला आणि कुसल मेंडिस (१९), कामिंडू मेंडिस (११), चरित असालंका (६) आणि अँजेलो मॅथ्यूज (१६) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

नॉर्खियाने ४ षटकांत केवळ ७ धावा दिल्या आणि ४ बळी घेतले. कागिसो रबाडा आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. महाराजने एकाच षटकात दोन्ही विकेट घेतल्या.

त्याने कर्णधार वानिंदू हसरंगा (०) आणि सदिरा समरविक्रमा (०) यांना बाद केले. दासुन शनाका (९) आणि मथिशा पाथिराना (०) यांना रबाडाने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तर नुवान तुषारा (०) धावबाद झाला. ओटनीएल बार्टमनला एक विकेट मिळाली. श्रीलंकेची टी-२० विश्वचषकातील सर्वात कमी धावसंख्या आहे.

 

Whats_app_banner