Ranji Trophy selection scam 2024: रणजी आणि सीके नायडू ट्रॉफी (23 वर्षाखालील) खेळाडूंची निवड प्रक्रिया सुरू झाली. राष्ट्रीय स्तरावर खेळल्या जाणाऱ्या रणजी आणि सीके नायडू ट्रॉफीत खेळण्याचे अनेकांचे स्वप्न साकार होणार आहे. यासाठी राजनगर एक्स्टेंशन येथील अल्फा क्रिकेट मैदानावर खेळाडू सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसतोय. याच पार्श्वभूमीवर रणजी ट्रॉफीमध्ये संधी देण्याचे आमिष दाखवून रत्नागिरीतील सहा खेळाडूंची एकून ६३ लाखांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी मालाड पोलीस स्थानकात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी मालाड पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
प्रशांत कांबळे आणि देवेश उपाध्याय अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. कांबळे हा मुख्य आरोपी असून उपाध्यायने स्वत:ला बॉलिवूड अभिनेता सोनू सूदचा सहाय्यक असल्याचे भासवले. याशिवाय, संतोष चव्हाण नावाचा व्यक्ती आहे, जो इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय करतो आणि त्याने आरोपींशी क्रिकेटपटूंची ओळख करून दिली. मिळालेल्या माहितीनुसार, चव्हाणची कंपनी गेल्या १५ वर्षांपासून राजकीय, लग्नाचे, क्रिकेट सामन्यांसह विविध खेळांचे कार्यक्रम आयोजित करत आहे. यातील एका कार्यक्रमात चव्हाण कांबेळ याला भेटला. त्यानंतर कांबळे याने चव्हाणची ओळख उपाध्याय याच्याशी करून दिली.
उपाध्यायने चव्हाणला बीसीसीआय मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी असलेले संबंध पटवून दिले आणि त्याच्या खेळाडूंना रणजी ट्रॉफीत खेळण्याची संधी मिळेल, असे वचन दिले. त्याच्यावर विश्वास ठेवून चव्हाणने सहा युवा खेळाडूंची शिफारस केली. त्यांचे कौशल्य पाहिल्यानंतर कांबळेने त्यांना गोरेगाव येथे नेट प्रॅक्टिससाठी बोलावले. सविस्तर चर्चेनंतर चव्हाणने खेळाडूंची माहिती आणि इतर कागदपत्रे कांबळे यांना दिली. खेळाडूंना मणिपूर आणि बिहार क्रिकेट असोसिएशनच्या लेटरहेडवर निवडपत्रे देण्यात आली. संपूर्ण प्रक्रिया ऑक्टोबर २०१८ मध्ये सुरू झाली आणि २०२२ पर्यंत चालू राहिली. यादरम्यान, अनेकदा पैशांची देवाण-घेवाण झाली.
या सहा खेळाडूंना नागालँड, मणिपूर, बिहार आणि मिझोराम येथे पाठवण्यात आले. मात्र सात दिवसांनी परत बोलावण्यात आले. सहा खेळाडूंनी कांबळे व उपाध्याय यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, दोघांनीही टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. यानंतर खेळाडूंनी रणजी ट्रॉफीत न खेळण्याचा निर्णय घेतला आणि दिलेले ६३ लाख रुपये परत करण्याची मागणी केली. चव्हाणने प्रयत्न करूनही पैसे परत मिळाले नाहीत. विविध राज्य क्रिकेट संघटनांकडून पाठवलेली रक्कम आणि निवडपत्रे बनावट असल्याचे आढळून आले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याची खेळाडूंच्या लक्षात आले. त्यांनी त्वरीत मालाड पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात फिर्याद दिली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.
संबंधित बातम्या