टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज शुभमन गिलचा जबरदस्त फॉर्म आयपीएल २०२४ मध्येही कायम आहे. रविवारी(२२ एप्रिल) पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने ३५ धावांची शानदार खेळी केली. या मोसमात शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने आतापर्यंत ४ सामने जिंकले आहेत.
भारताचा माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा शुभमन गिलच्या कॅप्टन्सीने खूप प्रभावित झाला आहे. तो म्हणाला की, भविष्यात तो टीम इंडियाच्या कर्णधारपदी दिसणार आहे.
रॉबिन उथप्पा म्हणाला की, गिल हळूहळू महान कर्णधार बनत आहे. तो भारतीय क्रिकेटला खरोखरच एक देणगी आहे. त्याच्यात महान खेळाडू बनण्याची क्षमता आहे. तो शुभमन एक महान खेळाडू होताना दिसत आहे".
दरम्यान, पंजाबविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर शुभमन गिल म्हणाला की, मी कर्णधारपदाचा आनंद घेत आहे. मात्र, मी फलंदाजी करताना कर्णधारपदाचा विचार करत नाही.
शुभमन गिलने यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत २९८ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने २ अर्धशतके केली असून त्याची सर्वोत्तम धावसंख्या ८९ आहे.
गुजरात टायटन्सचा शुभमन गिलने आयपीएलमध्ये आतापर्यंत ९१ सामने खेळले आहेत ज्यात त्याने १३४.०७ च्या स्ट्राइक रेटने २७९० धावा केल्या आहेत. गिलच्या नावावर ३ शतके आणि १८ अर्धशतकांची नोंद आहे. त्याची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या १२९ आहे. गिल त्याच्या ६ वर्षांच्या आयपीएल कारकिर्दीत कोलकाता नाईट रायडर्स फ्रँचायझीसाठीही खेळला आहे.
शुभमन गिलच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर एक नजर टाकल्यास, त्याने भारतासाठी १८ कसोटी, २९ एकदिवसीय आणि ११ टी-20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत ३२.२ च्या सरासरीने ९६६ धावा, एकदिवसीय सामन्यात ६३.०८ च्या सरासरीने १५१४ धावा आणि आंतरराष्ट्रीय T20 मध्ये ३०.४ च्या सरासरीने ३०४ धावा केल्या आहेत. गिलची वनडे सरासरी जबरदस्त आहे.