India vs England 2nd Test Day 3, Vizag : भारत आणि इंग्लंड यांच्यात विशाखापट्टणम येथे दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे.आज (४ फेब्रुवारी) सामन्याचा तिसरा दिवस असून भारतीय संघाचा दुसरा डाव सुरू आहे.
भारताच्या दुसऱ्या डावात शुभमन गिलच्या बॅटमधून शानदार खेळी पाहायला मिळाली. शुभमन गिल गेल्या काही काळापासून खराब फॉर्मशी झुंजत आहे, पण संघाला त्याची गरज असताना त्याने मोठी खेळी खेळली आहे. विशेष बाब म्हणजे शुबमन गिलने ११ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर कसोटी फॉर्मेटमध्ये शतक झळकावले आहे.
शुभमन गिलला मागील १३ कसोटी डावांमध्ये एकदाही ५० धावांचा टप्पा गाठता आला नव्हता. मात्र त्याने ही दीर्घ प्रतीक्षा संपवली आहे. इंग्लंडविरुद्धच्या विशाखापट्टणम कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात त्याने शतक पूर्ण केले. त्याने १४७ चेंडूत १०४ धावा केल्या. यादरम्यान शुभमन गिलने ११ चौकार आणि २ षटकार मारले. शुभमन गिलचे हे कसोटीतील तिसरे शतक आहे.
यापूर्वी त्याने मार्च २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावले होते. त्याआधी त्याने बांगलादेशविरुद्ध पहिले कसोटी शतक झळकावले होते.
शुभमन गिल गेल्या काही काळापासून कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे. तिसऱ्या क्रमांकावर खेळताना शुभमन गिलचे हे पहिलेच कसोटी शतक आहे. त्याचवेळी, २०१७ नंतर ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा भारतीय फलंदाजाने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना भारतीय भूमीवर शतक केले आहे. यापूर्वी नोव्हेंबर २०१७ मध्ये चेतेश्वर पुजाराने तिसऱ्या नंबरवर खेळताना भारतीय भूमीवर शतकी खेळी केली होती.
विशाखापट्टणम कसोटीच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. दुसऱ्या डावात रोहित शर्मा १३ धावा करून बाद झाला. यानंतर यशस्वी जैस्वाललाही केवळ १७ धावा करता आल्या. त्याचवेळी श्रेयस अय्यर २९ आणि रजत पाटीदार ९ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. पण शुभमन गिलने शतकी खेळी करत डाव सावरला.