भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना आजपासून (७ मार्च) सुरू झाला आहे. हिमाचल प्रदेशातील धरमशाला येथे हा सामना खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
यानंतर झॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी इंग्लंडच्या डावाची चांगली सुरुवात केली. दोघांनी १८ षटकात ६४ धावांची सलामी दिली. अशा स्थितीत कर्णधार रोहित शर्माने जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजला थांबवून चेंडू फिरकीपटूकडे सोपवला. कुलदीप यादवने टीम इंडियासाठी १८ वे षटक टाकले.
इंग्लंडच्या दोन्ही फलंदाजांनी कुलदीप यादवच्या या षटकातील ५ चेंडू सावधपणे खेळले, पण शेवटचा चेंडू बेन डकेटने हवेत मारला. चेंडू बॅटच्या वरच्या काठावर आदळल्यानंतर हवेत गेला, चेंडू क्षेत्ररक्षकापासून खूप दूर होता. मात्र, असे असतानाही शुभमन गिल झेल घेण्यासाठी धावला आणि झेल पूर्ण केला. अशा प्रकारे इंग्लंडला पहिला धक्का बसला.
दरम्यान, हा झेल पाहून चाहत्यांना ऐतिहासिक कपिल देवच्या झेलची आठवण झाली. कपिल देवने १९८३ च्या वर्ल्डकप फायनलमध्ये असाच झेल पकडला होता.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील ४ सामने खेळले गेले आहेत. टीम इंडियाने ३ सामने जिंकले आहेत. तर इंग्लंडला केवळ १ सामन्यात विजय मिळवता आला आहे. अशा प्रकारे भारत ३-१ ने आघाडीवर आहे.
इंग्लंडने केवळ हैदराबाद कसोटी सामना जिंकला होता. यानंतर विशाखापट्टणम, राजकोट आणि रांची कसोटीत भारताने विजय मिळवला.