भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना हैदराबाद येथे खेळवला जात आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद २४६ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने आज (२६ जानेवारी) दुसऱ्या दिवसअखेर ७ बाद ४२१ धावा केल्या आहेत.
दरम्यान, या सामन्यात भारतीय फलंदाज शुभमन गिलकडून दमदार कामगिरीची अपेक्षा होती. पण त्याने सपशेल निराशा केली आहे. पहिल्या डावात केवळ २३ धावा करून गिल बाद झाला.
पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या टॉम हार्टलीच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात गिल मिडऑफवर झेलबाद झाला.
तसं पाहिलं तर शुभमन गिल कसोटी क्रिकेटमध्ये बऱ्याच काळापासून आउट ऑफ फॉर्म आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलपासून गिलने या फॉरमॅटमध्ये एकही अर्धशतक झळकावलेले नाही. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही गिलची बॅट शांत राहिली आणि त्याला ४ डावांत केवळ ७४ धावाच करता आल्या.
शुभमन गिलने ९ मार्च २०२३ रोजी अहमदाबाद येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत शेवटचे शतक झळकावले होते. तेव्हापासून गिलने १३, १८, ६, १०, २९, २,२६, ३६, १०, २३ अशा इनिंग खेळल्या आहेत. गिलची कसोटी सरासरीही ३० च्या जवळ आली आहे. गिलने आतापर्यंत २१ कसोटी सामन्यांमध्ये ३०.३७ च्या सरासरीने १०६३ धावा केल्या आहेत, यात २ शतके आणि ४ अर्धशतके आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये शुभमन गिलकडून खूप अपेक्षा आहेत, पण तो ज्या पद्धतीने खेळत आहे, ते पाहता तो टीम मॅनेजमेंटसाठी डोकेदुखी ठरला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. ही कोणत्याही संघासाठी अत्यंत महत्त्वाचे स्थान असते. चेतेश्वर पुजाराच्या वगळल्यानंतर गिलला तिसऱ्या क्रमांकावर सातत्याने संधी दिली जात आहे, मात्र त्याला यश मिळू शकलेले नाही. गिलचा फॉर्म असाच राहिल्यास निवडकर्त्यांना इतर पर्यायांचा विचार करावा लागेल.