भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना ६ डिसेंबरपासून अॅडलेड ओव्हल मैदानावर खेळला जाणार आहे. पण या सामन्याआधी टीम इंडिया ३० नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलिया प्राइम मिनिस्टर इलेव्हन यांच्यात दोन दिवसीय सराव सामना खेळला जाणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील दुसरा कसोटी सामना गुलाबी चेंडूने खेळला जाणार आहे, जो डे-नाईट कसोटी असेल. सराव सामनाही गुलाबी चेंडूने खेळला जाणार आहे.
शुभमन गिल पहिल्या कसोटी दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता, पण आता तो दुसरा कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. खरं तर गिल कॅनबेरा मध्ये टीम इंडियासोबत सराव करताना दिसला आणि नेटमध्ये फलंदाजीचा जोरदार सराव केला. सरावादरम्यान गिल खूपच कम्फर्टेबल दिसत होता आणि टीम इंडियासाठी ही आनंदाची बातमी आहे.
सोबतच कर्णधार रोहित शर्मादेखील अॅडलेड कसोटीतून पुनरागमन करेल. रोहित १५ नोव्हेंबरला दुसऱ्यांदा वडील झाला आणि यामुळे तो पहिल्या कसोटी सामन्यात निवडीसाठी उपलब्ध नव्हता.
रोहित आणि गिलच्या पुनरागमनामुळे टीम इंडियात बरेच बदल होऊ शकतात. प्लेइंग इलेव्हनमध्ये या दोघांच्या पुनरागमनामुळे कोणाला बाहेर बसावे लागू शकते आणि फलंदाजी क्रमात कोणते बदल दिसू शकतात याचीही जोरदार चर्चा सुरू आहे.
भारताने पर्थ कसोटी सामना २९५ धावांनी जिंकला आणि रोहितच्या अनुपस्थितीत केएल राहुलने यशस्वी जैस्वालसह डावाची सुरुवात केली. केएलने पहिल्या डावात २६ तर दुसऱ्या डावात ७७ धावा केल्या होत्या. पहिल्या डावात टीम इंडिया अवघ्या १५० धावांवर गारद झाली आणि केएल अत्यंत दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, अशा परिस्थितीत त्याची पहिल्या डावातील २६ धावांची खेळी अत्यंत महत्त्वाची ठरली.
आता रोहित आणि गिलच्या पुनरागमनामुळे देवदत्त पडिक्कल आणि ध्रुव जुरेल प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर पडतील हे निश्चित दिसत आहे, पण एक प्रश्न उपस्थित होत आहे तो म्हणजे रोहित परतला तर केएलला मधल्या फळीत फलंदाजीसाठी परत पाठवणे योग्य ठरेल का? कारण परदेशी खेळपट्ट्यांवर सलामीवीर म्हणून केएलचा रेकॉर्ड चांगला आहे. आता सलामीला कोण खेळणार हे पाहणेही रंजक ठरणार आहे.