ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीच टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या आहेत. आधीच खराब फॉर्मशी झगडत असलेल्या भारतीय संघातील खेळाडू आता सराव सत्रादरम्यान जखमी होत आहेत. सरफराज खान, विराट कोहली आणि केएल राहुल यांच्यापाठोपाठ शुभमन गिल यालाही शनिवारी क्षेत्ररक्षणादरम्यान दुखापत झाली. स्लिपमध्ये कॅच घेताना गिलच्या बोटाला दुखापत झाली आहे.
रेव्हस्पोर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार, शुभमन गिलला पर्थ येथील वाका स्टेडियमवर सुरू असलेल्या इन्ट्रा स्क्वाड सामन्याच्या दुसऱ्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना बोटाला दुखापत झाली. मात्र संघ व्यवस्थापन काही दिवस त्याच्या फिटनेसवर लक्ष ठेवेल, त्यानंतर त्याच्या उपलब्धतेबाबत निर्णय घेतला जाईल.
वाका येथील नेटमध्ये तीन दिवस घालवल्यानंतर भारताने मालिका सुरू होण्याच्या आठवडाभर आधी ऑप्टस स्टेडियमवर आपल्या मुख्य खेळाडूंना मैदानात उतरवून तयारी सुरू केली आहे. या इन्ट्रा स्क्वाड सामन्यात भारत अ आणि इतर काही खेळाडूंचा प्रतिस्पर्धी संघ म्हणून समावेश आहे.
रिपोर्टनुसार, शुभमन गिलच्या दुखापतीवर तीन दिवस नजर ठेवली जाईल, त्यानंतर तो पहिला कसोटी सामना खेळेल की नाही, यावर निर्णय घेतला जाईल. सामन्याच्या पहिल्या दिवशी केएल राहुल २९ धावांवर खेळत असताना वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाचा चेंडू त्याच्या कोपरावर आदळला. फिजिओचा सल्ला घेतल्यानंतर राहुल मैदानसोडून निघून गेला.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना २२ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा खेळला नाही, तर केएल राहुल त्याच्या जागी सलामीला खेळेल.
सिडनी मॉर्निंग हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार, स्टार फलंदाज विराट कोहलीचे दुखापतीमुळे गुरुवारी स्कॅन करण्यात आले. या फलंदाजाने मात्र शुक्रवारी सामन्यात भाग घेतला आणि १५ धावांची खेळी केली.