मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Shubman Gill : आता बस्स झालं! शुभमन गिलचा फ्लॉप शो सुरूच, कसोटी क्रिकेटमधून हकालपट्टी निश्चित

Shubman Gill : आता बस्स झालं! शुभमन गिलचा फ्लॉप शो सुरूच, कसोटी क्रिकेटमधून हकालपट्टी निश्चित

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 02, 2024 04:20 PM IST

Shubman Gill Test Stats Records : शुबमन गिलचा खराब फॉर्म अजूनही कायम आहे. इंग्लंडविरुद्धच्या विशाखापट्टणम कसोटीच्या पहिल्या डावात त्याने ३४ धावा केल्या. शुभमन गिलला जेम्स अँडरसनने बाद केले.

Shubman Gill Test
Shubman Gill Test (AP)

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून (२ फेब्रुवारी) विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा प्रिन्स शुबमन गिल पुन्हा फ्लॉप झाला आहे.

गिलचा खराब फॉर्म अजूनही कायम आहे. इंग्लंडविरुद्धच्या विशाखापट्टणम कसोटीच्या पहिल्या डावात त्याने ३४ धावा केल्या. शुभमन गिलला जेम्स अँडरसनने बाद केले. 

शुभमन गिल बऱ्याच काळापासून कसोटी फॉरमॅटमध्ये सतत संघर्ष करत आहे. हैदराबाद कसोटीतही शुभमन गिलने निराशा केली होती. अशा स्थितीत शुभमन गिलला कसोटी क्रिकेटमधून बाहेर केले जाऊ शकते.

गिलचे टीम इंडियातून बाहेर पडणे निश्चित

हैदराबाद कसोटीच्या पहिल्या डावात शुभमन गिल २३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला होता. शुभमन गिलला टॉम हार्टलेने बाद केले. यानंतर तो दुसऱ्या डावात शुन्यावर बाद झाला. त्यावेळीही टॉम हार्टलीने शुभमन गिलला आपला शिकार बनवले. 

एकदिवसीय आणि टी-२० फॉरमॅटमध्ये शुभमन गिलचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे, पण कसोटी फॉरमॅटमध्ये तो अपेक्षेप्रमाणे खास काही करू शकला नाही.

शुभमन गिलने २२ कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे. यात त्याने २९.६५ च्या सरासरीने १०९७ धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये शुभमन गिलच्या नावावर २ शतके आहेत. याशिवाय ४ अर्धशतके आहेत.

कसोटीत शुभमन गिलचे आकडे खराब

शुभमन गिलने ९ मार्च २०२३ रोजी अहमदाबाद येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत शेवटचे शतक झळकावले होते. तेव्हापासून गिलने १३, १८, ६, १०, २९, २,२६, ३६, १०, २३,०, ३४ अशा इनिंग खेळल्या आहेत.

तसं पाहिलं तर शुभमन गिल कसोटी क्रिकेटमध्ये बऱ्याच काळापासून आउट ऑफ फॉर्म आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलपासून गिलने या फॉरमॅटमध्ये एकही अर्धशतक झळकावलेले नाही. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही गिलची बॅट शांत राहिली आणि त्याला ४ डावांत केवळ ७४ धावाच करता आल्या.

WhatsApp channel