Shubman Gill Test Century- चेन्नई कसोटीत तिसऱ्या दिवशी (२१ सप्टेंबर) शुभमन गिलने दमदार फलंदाजी केली. भारताच्या दुसऱ्या डावात गिलने बांगलादेशच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला आणि ऋषभ पंतसोबत १६७ धावांची शानदार भागीदारी केली. पंत १०९ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर लगेचच शुभमन गिलने स्फोटक शतक झळकावले.
गिलने १६१ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. हे त्याचे कसोटी कारकिर्दीतील ५ वे शतक आहे आणि २०२४ मधील तिसरे कसोटी शतक आहे.
एवढेच नाही तर २०२२ सालापासून त्याचे हे १२वे आंतरराष्ट्रीय शतक आहे. अशाप्रकारे, तो २०२२ नंतर सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनला आहे. त्याने बाबर आझम, विराट कोहली आणि जो रूट यांना मागे टाकले आहे.
१२ शतकं - शुभमन गिल*
११ शतकं - बाबर आझम
११ शतक - जो रूट
१० शतकं - विराट कोहली
०९ शतकं - ट्रॅव्हिस हेड
भारतासाठी कसोटीत ५ वे शतक झळकावणारा शुभमन गिल हा ८वा सर्वात तरुण भारतीय फलंदाज ठरला. याबाबतीत गिलने विराट कोहलीचा विक्रम मोडला. गिलने वयाच्या २५ वर्षे, १३ दिवसात ५ वे कसोटी शतक झळकावले, तर विराट कोहलीचे ५ वे कसोटी शतक वयाच्या २५ वर्षे, ४३ दिवसात झाले होते.
१९ वर्षे, २८२ दिवस - सचिन तेंडुलकर
२२ वर्षे, २१८ दिवस - रवी शास्त्री
२३ वर्षे, २४२ दिवस - दिलीप वेंगसरकर
२४ वर्षे, ३ दिवस - मोहम्मद अझरुद्दीन
२४ वर्षे, ७३ दिवस - मन्सूर अली खान पतौडी
२४ वर्षे, २७० दिवस - ऋषभ पंत
२४ वर्षे, ३३१ दिवस - सुनील गावस्कर
२५ वर्षे, १३ दिवस - शुभमन गिल*
२५ वर्षे, ४३ दिवस - विराट कोहली
या शतकामुळे गिल आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये सर्वाधिक शतके करणारा दुसरा भारतीय फलंदाज बनला आहे. त्याने मयंक अग्रवाल, ऋषभ पंत आणि विराट कोहली यांना मागे टाकले. कर्णधार रोहित शर्माने WTC मध्ये भारतासाठी सर्वाधिक ९ शतके झळकावली आहेत.
९ - रोहित शर्मा (५६ डाव)
५ - शुभमन गिल (४८ डाव)*
४ - मयंक अग्रवाल (३३ डाव)
४ - ऋषभ पंत (४३ डाव)
४ - विराट कोहली (६२ डाव)
भारताने आपला दुसरा डाव ४ बाद २८७ धावांवर घोषित केला. अशा प्रकारे भारताने बांगलादेशला विजयासाठी ५१४ धावांचे मोठे लक्ष्य दिले आहे. शुभमन गिल ११९ धावा करून नाबाद परतला तर केएल राहुल २२ धावा करून नाबाद राहिला. पंतने १०९ धावांचे योगदान दिले.