टीम इंडियाचा युवा स्टार शुभमन गिल याने रविवारी (८ सप्टेंबर) आपला २५ वा वाढदिवस साजरा केला. म्हणजेच, शुभमन त्याच्या वयाच्या आणि आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचला आहे. अशातच आता त्याच्या २५ व्या वाढदिवसाच्या पार्टीतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये तो प्रसिद्ध पंजाबी संगीतकार करण औजलासोबत गाणे गाताना दिसत आहे. शुभमनचा जन्म पंजाबमधील फाजिल्का शहरात झाला असून त्याला पंजाबी गाण्यांची खूप आवड आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये शुभमन गिल दिव्य आणि करण औजला यांचे '100 मिलियन' गाणे गाताना दिसत आहे आणि त्याने डान्सही केला आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त तो खूप मस्ती करताना दिसत आहे.
या खास प्रसंगी भारताचा अनुभवी क्रिकेटपटू युवराज सिंग याने शुभमन गिलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. गिलसाठी पुढचे वर्ष चांगले जाईल, अशी आशा युवराजने व्यक्त केली.
क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर, बांगलादेशविरुद्धच्या २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत शुभमन गिलची निवड झाली आहे. भारतीय संघासाठी गिल कदाचित तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसेल. पण सध्याच्या फॉर्मबद्दल बोलायचे झाले तर दुलीप ट्रॉफी २०२४ च्या पहिल्या सामन्यात गिल काही खास कामगिरी करू शकला नाही.
भारत अ संघाचे कर्णधार असलेल्या शुभमन गिलने पहिल्या डावात २५ धावा आणि दुसऱ्या डावात २१ धावा केल्या. दोन्ही वेळी त्याला नवदीप सैनीने बाद केले. म्हणजेच गिल दोन्ही वेळा वेगवान गोलंदाजाविरुद्ध बाद झाला आणि त्याने दोन्ही डावात एकाच गोलंदाजाला विकेट दिली.
बांगलादेश क्रिकेट संघ सध्या तुफान फॉर्मात आहे. बांगलादेशने नुकतेच पाकिस्तानचा त्यांच्या घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत २-० असा पराभव केला आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात बांगलादेशचा पाकिस्तानविरुद्ध पहिला कसोटी मालिका विजय आहे. त्या मालिकेत बांगलादेशच्या नाहिद राणाने पाकिस्तानी फलंदाजांचा धुव्वा उडवला होता.
विशेषत: दुसऱ्या कसोटीत त्याने चांगली कामगिरी केली, तर वेगवान तस्किन अहमदही दमदार फॉर्ममध्ये आहे.