IPL Mega Auction : इंडियन प्रीमियर लीग २०२५ साठी खेळाडूंचा मेगा लिलाव २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी जेद्दाह येथे होणार आहे. या लिलावाच्या एक दिवसआधी श्रेयस अय्यरने वादळी फलंदाजी करत अवघ्या ४७ चेंडूत शतक ठोकले आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या माजी कर्णधाराने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये गोव्याविरुद्ध शतकी खेळी केली.
श्रेयस अय्यर मुंबई संघाचा कर्णधार आहे. या शतकानंतर आता अय्यरवर आणखी मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. श्रेयस अय्यरने अवघ्या ४७ चेंडूत शतक झळकावले आहे.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबई आणि गोवा यांच्यातील सामन्यात श्रेयस अय्यरने धुमाकूळ घातला. त्याने अवघ्या ४७ चेंडूत दमदार शतक झळकावले. मुंबईचे कर्णधार असलेला अय्यर गोव्याविरुद्ध शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याने २२८ च्या तुफानी स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना ५७ चेंडूत नाबाद १३० धावा केल्या. अय्यरने ११ चौकार आणि १० षटकार मारले.
गोव्याने मुंबईविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, तो अगदी चुकीचा ठरला. श्रेयस अय्यरच्या शतकी खेळीमुळे मुंबईने २० षटकांत ५ गडी गमावून २५० धावा केल्या. शम्स मुलानी शेवटी आला आणि त्याने वेगवान ४१ धावा केल्या. पृथ्वी शॉने डावाला सुरुवात करत ३० धावा केल्या.
IPL २०२५ च्या मेगा लिलावात श्रेयस अय्यरची मूळ किंमत २ कोटी रुपये आहे. तो मार्की सेट खेळाडूंच्या पहिल्याच गटात आहे. या मेगा लिलावात अय्यरला चांगली बोली लागण्याची पूर्ण शक्यता आहे. आणि या शतकानंतर आता सर्वांच्या नजरा अय्यरवर असतील.
श्रेयसने आतापर्यंत आयपीएलमध्ये खेळलेल्या ११६ सामन्यांमध्ये १२७.५ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना ३१२७ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये अय्यरच्या नावावर २१ अर्धशतके आहेत.