इराणी चषक २०२४ मध्ये मुंबईचा सामना शेष भारताविरुद्ध (Rest of India) होणार आहे. श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूर या स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत. इराणी चषकाचा हा सामना १ ते ५ ऑक्टोबर दरम्यान लखनौ येथे होणार आहे. या सामन्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) आपला संघ जाहीर केलेला नाही. मात्र, अजिंक्य रहाणे मुंबईचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या संघाने या वर्षाच्या सुरुवातीला विक्रमी ४२व्यांदा रणजी ट्रॉफी जिंकली होती. आता संघाच्या नजरा इराणी चषक जिंकण्यावर असतील.
शार्दुल ठाकुरचे मुंबईच्या रणजी संघात पुनरामगन होणार आहे. शार्दुलमुळे संघाची गोलंदाजीसोबतच फलंदाजीही मजबूत होणार आहे. अष्टपैलू शार्दुल ठाकूर जूनमध्ये घोट्याच्या शस्त्रक्रियेनंतर क्रिकेटपासून दूर आहे.
तो नुकताच केएससीए स्पर्धेत सहभागी झाला होता. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, त्याने पाच दिवसीय प्रथम श्रेणी सामन्यासाठी स्वत:ला उपलब्ध केले आहे. ईराणी चषकासाठी एमसीए मंगळवारी (२४ सप्टेंबर) संघाची घोषणा करतील, अशी अपेक्षा आहे.
मुंबईच्या संघात श्रेयस अय्यर हादेखील खेळताना दिसणार आहे. श्रेयस दुलीप ट्रॉफीतही दिसला होता. तो इंडिया डी संंघाचा कर्णधार होता.
बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रेयस अय्यर याला भारतीय संघात स्थान मिळाले नाही. तो सतत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतण्याचा मार्ग शोधत असतो. अय्यर रेस्ट ऑफ इंडियाविरुद्धच्या सामन्यातही मुंबईकडून खेळताना दिसणार आहे.