टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर याने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत तुफानी फलंदाजी केली. भारताने १९ धावांत २ विकेट गमावल्या होत्या. यानंतर क्रीजवर आलेल्या अय्यरने ३० चेंडूत अर्धशतक केले. ३६ चेंडूत ५९ धावांची खेळी करून तो बाद झाला.
या सामन्यानंतर एक रंजक बाब समोर आली. अय्यरनेच या सामन्यानंतर खुलासा केला की तो या सामन्यात खेळणार नव्हता. पण सुदैवाने त्याला संधी मिळाली.
गुडघ्याच्या समस्येमुळे विराट कोहली इंग्लंडविरुद्धचा पहिला वनडे खेळू शकला नाही. त्याच्या जागी श्रेयस अय्यर याला संधी मिळाली. सामन्यानंतर बोलताना अय्यर म्हणाला, की 'ही एक मजेदार स्टोरी आहे. मी काल रात्री एक चित्रपट पाहत होतो, वाटलं उशिरापर्यंत जागावं. पण तेवढ्यात कर्णधाराकडून फोन आला की, विराटच्या गुडघ्याला सूज आल्याने तो खेळू शकणार नाही. तुला संधी मिळू शकते. मग मी पटकन माझ्या खोलीत गेलो आणि लगेच झोपी गेलो.
कसोटी आणि टी-20 मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या यशस्वी जैस्वाल याने वनडेमध्ये पदार्पण केले. त्याच्या खेळामुळेच श्रेयस अय्यरला बेंचवर बसावे लागले असते.
संघात यशस्वी जैस्वाल याच्या आगमनाने भारताच्या रोहित आणि शुभमन गिल या नियमित सलामीच्या जोडीत बदल झाला, गिल तिसऱ्या क्रमांकावर खेळला. या सामन्यात विराट खेळला असता तर चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरले असते. अय्यरने वनडेत चौथ्या क्रमांकावर स्वत:ला सिद्ध केले आहे.
२०२३ च्या विश्वचषकात त्याने ११ सामन्यात ५३० धावा केल्या होत्या. ज्यामध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये ७० चेंडूत १०५ धावांचाही समावेश आहे. त्याचा ११३.२४ हा स्ट्राईक रेट भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांमध्ये सर्वोत्तम होता.
संबंधित बातम्या